Nashik Kala Katta: शिल्पसंवादाचे नायक : शिल्पकार वरुण भोईर

Sculptor Varun Bhoir
Sculptor Varun Bhoiresakal

"परंपरेच्या बंधनात राहूनही चौकटीबाहेरचा प्रवाही कलाविचार समजून घेणारे आणि त्यातूनच स्वसंवादात रमणारे कलाकार फार थोडे असतात. नाशिकचे युवा शिल्पकार वरुण भोईर अशाच संवेदनशील कलाकारांपैकी एक. मातीच्या निर्गुण गोळ्यात रममाण होत असतानाच शिल्पाच्या सगुण भाषेला आकार देणारे वरुणजी ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, समोर जे काही दिसते ते जसेच्या तसे साकारणे याहिपेक्षा दृश्याच्या पलीकडे जाऊन बघण्यात एक वेगळे आव्हान आहे. शिल्पकलेत मला कल्पनेचा हा अतर्क्य प्रांत, समाधानाच्याही पलीकडचे जाऊन बरेच काही देत असतो."- तृप्ती चावरे-तिजारे

(Nashik Kala Katta Hero of Sculpture Sculptor Varun Bhoir)

वरुणजींचा शिल्पप्रवास अगदी बालवयात, त्यांच्या वडिलांसमोरच शिल्पकलेचे धडे गिरवीत सुरू झाला. शालेय शिक्षणानंतर नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. चित्रकला आणि शिल्पकला परस्पर पूरक कला आहेत.

चित्रकलेत रेषांवरची पकड पक्की असेल तर शिल्पातील त्रिमितीय आविष्कार स्वतःच्या कलात्मक पद्धतीने साकारणे सोपे जाते हे त्यांना जाणवले आणि कलावारसा म्हणून लाभलेल्या त्यांच्यातील शिल्पकलेस पैलू पडण्यासाठी ते जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखल झाले.

त्यांची कौशल्यपूर्ण शिल्पे बक्षीसे पटकावू लागली. त्यातूनच प्रेरणा घेत वरुणजींनी साकारलेले ‘अवस्था’ हे हेड सीरिज शिल्प अभूतपूर्व कलाकृती म्हणून चर्चेत आले. स्त्री, साधू आणि घोडा यांचे ‘हेड्स’ बघताना नकळतपणे आपण मानवी मनातील एका भाव अवस्थेत प्रवेश करतो.

हाताचे कौशल्य, मनाची एकाग्रता आणि विचारांची कलात्मकता या तिहेरी आविष्काराचा हा त्रिवेणी संगम आहेत. कलावंतांचे आयुष्य हे निर्मितीच्या उत्कट आनंदासह साफल्याच्या भावनेला स्पर्श करणारे असते.

कलानिर्मितीच्या या प्रक्रियेत कलावंतांची प्रतिमेपासून सुटका नसते. उत्कट प्रतिमेतूनच कलावंतांच्या विचारांची नांदी त्याच्या प्रतिभेभोवती रुंजी घालत असते.

एका बाजूला कल्पकता तर दुसऱ्या बाजूला तंत्रकुशलता यांचा उत्तम समतोल साधत विषयातील आशयानुसार व्यक्त होणारी वरुणजींची शिल्पकला ही अशीच भावोत्कट अभिव्यक्ती आहे.

त्यांच्या कला शैलीबद्दल ते म्हणतात, ‘बोल्ड पॅच वर्क’ म्हणजेच फिनिश न करता, मातीला गुळगुळीत न करता, मातीतून शिल्पाचा फील घेणे, यात मला विशेष आनंद मिळतो.

Sculptor Varun Bhoir
Nashik Kala Katta: हृदयस्पर्शी, भावपूर्ण अभिजात व्हायोलिन वादक : अनिल दैठणकर

शिल्प म्हणजे केवळ एखाद्या मूळ वस्तूची अनुकृती नव्हे, तर तो एक स्वसंवाद असतो. यात कलाकाराने स्वातंत्र्य जरूर घ्यावे, पण त्यात आपण नवीन काय देत आहोत हेही तपासले पाहिजे.

वरुणजींच्या गुरुस्थानी असलेले श्रेष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्या शैलीतून प्रेरित होऊन, त्यांनी साकारलेले, ‘एका आईचे तिच्या तीन अपत्यांसोबतचे शिल्प’ हे त्यांच्या दर्जेदार शिल्पकृतीचा एक उत्तम नमुना आहे.

तान्हुल्या बाळाला कमरेवर घेणारी आई, मातृत्वाने ओतप्रोत भरलेले तिचे हावभाव, कमरेवर बाळ बिलगलेले असताना निर्माण झालेली कमरेची लय, झुकलेल्या शरीरयष्टीचा बाक, उत्कट भाव, ग्रामीण पण अत्यंत देखण्या अलंकारांनी सालांकृत झालेले तिचे रूप, वस्त्रांच्या चुण्या,

चोळीवरील बारीक नक्षीकाम तसेच दोन्ही बाजूस उभी असलेली तिची मुले, एकाच वेळी तिन्ही अपत्यांवर असलेली तिची नजर हे सगळे डिटेलिंग अत्यंत लोभस आणि नजरेला खिळवून ठेवणारे आहे.

मातीतून मनातला भाव कसा उलगडला जाऊ शकतो, हे विचारले असता ते म्हणतात, शाडू माती ही एकमेव अशी माती आहे की ज्यात हावभाव अचूक पकडता येतात.

Sculptor Varun Bhoir
Nashik Kala Katta: एकांत साधनेत रमणारे चित्रकार: अशोक ढिवरे

ग्रे शेडमुळे शिल्पातले टोन्स उत्कृष्ट दिसतात. या मातीचा उत्तम पोत, तसेच पाणी पकडून ठेवण्याची क्षमता हे सगळे गुण कोणतेही शिल्प साकारण्यासाठी सर्वतोपरी सुयोग्य आहेत. व्यक्तीशिल्पात व्यक्तीचा प्रत्यय शोधावा लागतो.

व्यक्तीचा स्वभाव, हावभाव, विशिष्ट ठेवण किंवा लकब साकारणे हे काही सहज साध्य नसते. अनुभवाने घडलेली नजर आणि शाडू मातीच्या स्पर्शाला सरावलेला हात कळला तरच या भावना हुबेहूब साकारण्यास मदत होते.

नाशिकचे ज्येष्ठ मूर्तिकार व रंगकर्मी स्व. नेताजी दादा भोईर यांचा वारसा चालवणारे त्यांचे नातू वरुण भोईर यांची दर्जेदार शिल्पनिर्मिती ही नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे.

कलेवर असलेले त्यांचे प्रेम, कल्पना कौशल्य, माध्यमांवरील हुकूमत,तांत्रिक ज्ञान, आणि विलक्षण आत्मविश्वास ही त्यांची ओळख त्यांचे आणि नाशिकचे कलाविश्व समृद्ध करणारी आहे. त्यांच्या भावी कलात्मक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा.

Sculptor Varun Bhoir
Nashik Kala Katta: कलावारसा समृद्ध करणारे समन्वयवादी बासरीवादक : समृद्ध कुटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com