राजवंश भारती : गुप्त वंश

Marathi Article : भारताच्या अभिजात कालखंडातील- ‘क्लासिकल एज’मधील सर्वांत श्रेष्ठ, महत्त्वाचा राजवंश म्हणजे गुप्त वंश.
Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain
Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjainesakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

भारताच्या अभिजात कालखंडातील- ‘क्लासिकल एज’मधील सर्वांत श्रेष्ठ, महत्त्वाचा राजवंश म्हणजे गुप्त वंश. गुप्त राजवटीला भारताचा ‘सुवर्ण कालखंड’ म्हणतात. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील अनेक महत्त्वाचे आविष्कार या काळातले आहेत. काही पुराणांची रचना, अभिजात संस्कृत महाकाव्ये, नाटके, धर्मग्रंथ, शास्त्रग्रंथ, शिल्पे, शिलालेख, मूर्ती, लेण्या, भित्तिचित्रे, अद्वितीय सुवर्णमुद्रा... अशा अनेक गोष्टी गुप्तांच्याच राजवटीत उदयाला आल्या.

राजकीय पटलावरही तत्कालीन आक्रमक असलेले शक, कुशाण, हूण हे सर्व गुप्त साम्राज्यापुढे दबून होते. सुमारे ३५ लाख चौरस किलोमीटरएवढा प्रचंड मोठा भूप्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली होता! (saptarang latest article on Rajvansh Bharti Gupta dynasty)

‘आयुका’ पुणे या संस्थेतील आर्यभट्टाचा पुतळा.
‘आयुका’ पुणे या संस्थेतील आर्यभट्टाचा पुतळा. esakal

सातवाहनांची सत्ता संपुष्टात आली, तशी शक क्षत्रपांनी पुन्हा उचल खाल्ली, हे आपण आधीच्या भागात पाहिले. या परिस्थितीत पुन्हा एकदा मगध प्रांत मदतीला आला. श्रीगुप्त नावाचा मगधातील एक छोटासा सरदार सातवाहनांचा अंकित होता. त्याने आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. त्याच्या नावावरून वंशाला ‘गुप्त वंश’ नाव मिळाले.

ही घटना अंदाजे इ. स. २४० मधील आहे, त्याचा मुलगा घटोत्कच. इथपर्यंत गुप्त शासन मगधात छोट्याशा प्रदेशापुरते मर्यादित होते. घटोत्कच राजाचा मुलगा चंद्रगुप्त पहिला याने लिच्छवी राजकुमारी ‘कुमारदेवी’ हिच्याशी विवाह केला आणि त्यामुळे त्याचे राज्य बरेच विस्तारले.

सामर्थ्यशाली समुद्रगुप्त

पहिल्या चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त गादीवर आला (इ. स. ३३५). याच्याच कारकीर्दीत गुप्त वंश हळूहळू शिखराकडे जाऊ लागला. भारतात ‘सुवर्णयुग’ सुरू झाले, ते समुद्रगुप्तामुळेच. चारही दिशांना पराक्रम गाजवून शक, कुशाणांना त्याने आपले मांडलिक बनविले.

दक्षिणपथातील म्हणजे आजच्या दक्षिण भारतातील अनेक राजांनाही त्याने युद्धात जिंकले. आपल्या ४५ वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास २० राज्ये त्याने जिंकली आणि गुप्त साम्राज्याला जोडली. त्याने अश्वमेध यज्ञही केला होता. त्याच्या या विजयाची प्रशस्ती कौशांबी येथील अशोक स्तंभावर त्याने कोरून घेतली आहे. हा स्तंभ पुढे मुघल राजवटीत कौशांबीहून प्रयागराज (अलाहाबाद) किल्ल्यात हलविला गेला.

इतिहास संशोधकांमध्ये एक वर्ग असा आहे, ज्यांचा दावा आहे, की ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिस याने ‘सँड्राकोटस्’ या नावाने ज्याचा उल्लेख केला आहे, तो समुद्रगुप्तच असला पाहिजे, चंद्रगुप्त मौर्य नव्हे. त्यांच्या मते गुप्त राजवट खरे तर इ. स. पूर्व ३२७ ते इ. स. पूर्व ८२ अशी होती. जेव्हा, की हीच राजवट बहुतेक इतिहासकार इ. स. २४० ते इ. स. ५५० अशी मानतात.  (latest marathi news)

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain
गुंता सोडवायची क्लृप्ती

चंद्रगुप्त विक्रमादित्य

गुप्तांनी समृद्धीचा कळस गाठला, तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत- इ. स. ३७५ ते ४१५ या काळात. एक मत असे, की समुद्रगुप्ताने आपला उत्तराधिकारी म्हणून थोरला मुलगा रामगुप्त याच्याऐवजी धाकट्या चंद्रगुप्ताला नेमले. दुसरे मत असे, की रामगुप्त गादीवर आला होता; पण शक/कुशाणांपुढे त्याने लोटांगण घातले.

हा देशद्रोह पाहून चंद्रगुप्ताने त्याची हत्या केली आणि लोकांनी चंद्रगुप्ताला राजा निवडले. कसेही असो, ही निवड त्याने अक्षरश: सार्थ ठरवली. बापाच्या दहा पावले पुढे राहून त्याने गुप्त साम्राज्य वैभव शिखरावर नेले. शकांची त्याने इतकी धूळधाण उडवली, की त्याला ‘शकारी’ ही पदवी मिळाली.

त्याने ‘विक्रम संवत्’ ही कालगणना सुरू केली, अशी धारणा आहे; पण ते संवत्सर इ. स. पूर्व ५७ ला सुरू होते. मग इ. स. ३७५ मध्ये गादीवर आलेला चंद्रगुप्त ती कशी सुरू करेल? हा उलगडा होत नाही. एक मोठा निर्णय घेऊन त्याने राजधानी पाटलीपुत्राहून अवंतीनगरीला म्हणजे आजच्या उज्जैनला हलविली.

रणांगणावर शत्रूचा कर्दनकाळ असलेला चंद्रगुप्त कला, शास्त्र, धर्म या विषयांमध्ये तेवढाच जाणकार होता. त्याने ‘विक्रमादित्य’ ही उपाधी धारण केली होती. तो अनेक प्राचीन लोककथांचा नायक आहे. प्रसिद्ध नीतिकथा संग्रह, ‘वेताळ पंचविशी’ किंवा विक्रम-वेताळमधला विक्रम किंवा सिंहासन बत्तीशीमध्ये बत्तीस सोनपुतळ्या ज्याचे सिंहासन सांभाळतात, तो विक्रम राजा हाच!

कालिदास, वराहमिहीर, धन्वंतरी, वररुची आदी नऊ विद्वान ‘नवरत्ने’ म्हणून त्याच्या दरबारी होते. ‘कवी कुलगुरू’ असे ज्याला म्हणतात, तो कालिदास आणि त्याची अजरामर महाकाव्ये सगळ्यांना माहिती आहेत. ती त्याने याच काळात लिहिली. याशिवाय, विख्यात गणिती आर्यभट्ट ज्याने ‘शून्या’चा आणि दशमान स्थानकांचा शोध लावला, ज्याने ‘पाय्’ या गणिती स्थिरांकाचे संख्यामूल्य काढले, ज्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा दावा सर्वप्रथम केला, तो आर्यभट्टही चंद्रगुप्ताच्याच काळात होता.  (latest marathi news)

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain
नशीब ‘ब्रोकन टेल’चे

विश्वप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाची स्थापनाही याच काळात त्याच्या मुलाने कुमारगुप्ताने केली. वात्स्यायनाचे ‘कामशास्त्र’ आणि विष्णुशर्म्याचे ‘पंचतंत्र’ हे अजरामर ग्रंथ याच काळात लिहिले गेले. आणखी एक मोठे सामाजिक स्थित्यंतर या काळात झाले. देवता पूजनासाठी ‘यज्ञ’ करणे, ही प्राचीन पद्धत हळूहळू मागे पडून देवता या मूर्तीरूपात साकार झाल्या आणि यज्ञस्थळाऐवजी देवाचा कायमस्वरूपी निवास म्हणून ‘मंदिर’ ही संकल्पना रुजली.

उत्तर प्रदेशात देवगड येथील ‘दशावतार मंदिर’ हे अशा प्रकारच्या अगदी पहिल्या पिढीच्या मंदिरांपैकी एक आहे. दिल्लीला कुतुबमिनार परिसरात असलेला प्रसिद्ध लोहस्तंभ हाही मुळात चंद्रगुप्तानेच उभारलेला आहे. धातूशास्त्रातील चमत्कार म्हणून तो ओळखला जातो.

गेली १६ शतके तो लोखंडी स्तंभ पाऊस, पाणी, ऊन खात उभा आहे; पण जराही गंजलेला नाही. त्या लोहात कसले मिश्रण तेव्हा केले, हे त्यांनाच माहिती! प्रसिद्ध चिनी प्रवासी ‘फा हेन’ हा इ. स. ४०५ च्या सुमारास चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. तेव्हाच्या वैभवाचे, सुबत्तेचे वर्णन त्याने करून ठेवले आहे.

अशा प्रकारची सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक प्रगती होण्यासाठी आधी राजकीय स्थैर्य आणि शांतता असावी लागते. ती चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत होती. राजकीय दूरदृष्टी ठेवून त्याने आपली कन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह वाकाटक घराण्यातील रुद्रसेनाशी करून दिला. शिवाय, राष्ट्रकुटांशी राजनैतिक मैत्री ठेवली. त्यामुळे तत्कालीन राजकीय आघाडीवर चंद्रगुप्त यशस्वी ठरला. तो खऱ्या अर्थाने ‘सम्राट विक्रमादित्य’ होता ! 

(क्रमशः)

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain
प्लास्टिक पिशव्यांचं स्लो पॉयझन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com