Nashik News | महानगर गॅस कंपनीला महापालिकेकडून दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik muncipal corporation fine on mgl gas limited company

नाशिक : 'महानगर गॅस' कंपनीला महापालिकेकडून दणका

नाशिक : घरोघरी गॅस पुरवठा करण्याचे आश्‍वासन देताना महापालिकेच्या पायाभूत सुविधांची तोडफोड करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीला महापालिकेच्या बांधकाम विभागाने जोरदार दणका देताना साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड भरून पावती सादर न केल्यास कामे थांबविण्याचा इशारादेखील दिला आहे. पंचवटी विभागात नऊशे मिमी व्यासाची पाइपलाइन फोडल्याने विभागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने तातडीने कारवाई करण्यात आली.

घरोघरी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी एमएनजीएल कंपनीकडून शहरात रस्त्यांच्या कडेला खोदकाम केले जात आहे. सदरचे खोदकाम करण्याच्या बदल्यात महापालिकेकडे जवळपास ८० कोटी रुपये तोडफोड फी भरल्याचा दावा कंपनीने केला आहे. एकूण २०५ किलोमीटरचे रस्ते खोदले जाणार असून, आतापर्यंत जवळपास नव्वद किलोमीटरची खोदाई झाली आहे. परंतु, एकीकडे खोदकाम करताना संपूर्ण शहरच खोदण्याची परवानगी मिळाल्याच्या आविर्भावात खोदकाम सुरू आहे. परंतु या खोदकामाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याने अनेकदा महापालिका, स्थायी समिती, तसेच प्रभाग समित्यांच्या बैठकांमध्ये जोरदार चर्चा होऊन आंदोलनेदेखील झाली.

परंतु, दोन दिवसांपूर्वी पंचवटी विभागाचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याच्या घटनेने बांधकाम व पाणीपुरवठा विभाग खडबडून जागा झाल्याने परिणामी एमएनजीएलला नोटीस काढावी लागली. पेठ रोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड सिग्नल जवळील नऊशे मिमी व्यासाची जलवाहिनी एमएनजीएलच्या रस्ते खोदकामात तीस एप्रिलला फुटल्याने पंचवटी विभागात पाणीपुरवठा होवू शकला नाही. त्यामुळे महापालिकेने एमएनजीएलला साडेबारा लाख रुपये दंडाची नोटीस बजावता काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

गावठाणात विस्कळितपणा

एमएनजीएल पाठोपाठ स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण भागात सुरू असलेल्या कामांमुळेदेखील पाइपलाइन फुटत असल्याने पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याची बाब स्मार्टसिटी कंपनीच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याचबरोबर जुने नाशिक भागात जलकुंभाचे काम तपासण्यासाठी ठेकेदाराकडून चार इंचीची पाइपलाइन महापालिकेच्या जलवाहिनीला जोडल्याची बाब समोर आल्याने स्मार्टसिटीला नोटीस पाठविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

Web Title: Nashik Muncipal Corporation Fine On Mgl Gas Limited Company

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top