
नाशिक : भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडेल?
नाशिक : मुस्लिम मतदारांची संख्या नजरेत भरणारी असली तरी कायमच भाजपला साथ देणाऱ्या या प्रभागात विकास व व्यक्ती विशेषत्वाला महत्त्व आहे. अनेक अनेक वर्षांपासून भाजपला साथ देणाऱ्या किंबहुना भाजपच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेकडून यंदा भगदाड पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा बदलत असल्याचे संकेत समजले जातील.
इंदिरानगर व नाशिक रोड भागाला जोडणारा हा प्रभाग विकासाच्या दृष्टीने नशीबवान समजला जातो. रिंगरोडचे जाळे, राष्ट्रीय बँका, शाळा, महाविद्यालयांचे जाळे, एटीएमचे जाळे, नाशिक- नाशिक रोडचा मध्य भाग, मल्टिप्लेक्स, हॉटेल या भागाची वैशिष्ट्ये आहेत. कॉलेज रोड, शरणपूर पेक्षाही सुंदर, असा अशोका मार्ग या भागाची शान समजला जातो. आर्टिलरी सेंटरच्या क्षेत्राला लागून असलेल्या या प्रभागाच्या भौगोलिक स्थानाच्या प्रेमात पडून मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी श्री श्री रविशंकर मार्ग मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. टोलेजंग इमारती, गेटेड कम्युनिटी स्कीममुळे या भागाचे महत्त्व वाढले आहे.
या प्रभागात वास्तव करणारा वर्ग उच्चभ्रू सुशिक्षित, तसेच मेट्रो पॉलिटीयन वर्गातील आहे. त्यामुळे येथे विकास हाच मुद्दा प्रचारात येतो. त्याव्यतिरिक्त शांत, संयमी किंवा एखादे विकासाचे काम झाले नाही तरी चालेल, परंतु अंगावर येणारा लोकप्रतिनिधी येथील मतदारांना सहन होत नाही. विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांच्या पंचवीस वर्षे विजयाचे हेच रहस्य आहे. भाजपने या भागात बरेचसे हात-पाय पसरले आहेत. भाजपच्या भक्कम किल्ल्याला धडका मारून शिवसेना अनेकदा रक्तबंबाळ झाला आहे. त्यामुळे यंदा भाजपच्या गडाला महाविकास आघाडीकडून भगदाड पडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वसंत गिते यांच्या सेनेतील पुनर्प्रवेशाने शिवसेनेच्या आशा बळावल्या आहेत. राष्ट्रवादीने ठराविक पाकीट जपून ठेवले ठेवले, बजरंगवाडीचा जवळपास साडेतीन हजारांचा भाग या प्रभागापासून तुटल्याने पैशाचे महत्त्व बरेचशे कमी झाल्याचे दिसून येत आहे.
प्रभागाची व्याप्ती
भारतनगर घरकुल, नंदिनीनगर, रॉयल कॉलनी, रहेनुमानगर, गुलशन कॉलनी, हरी संकुल सोसायटी परिसर, नारायणी हॉस्पिटल, पायोकिअर हॉस्पिटल.
उत्तर ः जुना मुंबई नाका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, नंदिनी नदी पुलापासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन श्री दर्शन अपार्टमेंट, वैद्यनगर पुलापर्यंत. दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन नंदादीप बंगल्यापर्यंत. पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन कानडे निवास, लक्ष्मी माता मंदिरापर्यंत. पूर्वेकडे नाशिक- पुणे महामार्ग बजरंगवाडी नाल्यावरील पुलापर्यंत.
पूर्व ः नाशिक- पुणे महामार्ग बजरंगवाडी नाल्यावरील पुलापासून महावीर मार्बल घेऊन नाशिक- पुणे रोडने दक्षिणपूर्व दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन डीजीपीनगर बाजूच्या मिलिटरी हद्दीपर्यंत.
दक्षिण ः नाशिक- पुणे रोडपासून डीजीपीनगर बाजूच्या मिलिटरी हद्दीने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन कॅनॉल रोडने उत्तरेकडील भाग घेऊन राजमुद्रा अव्हेन्यू अपार्टमेंटपर्यत. विठ्ठल मंदिर रस्त्याने पूर्वेकडे १८ मीटर रुंद रस्ता (पखाल रोडपर्यंत) व पखाल रोडने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन ३० मीटर रुंद रस्त्यावरील होंडा शोरूमपर्यंत. तीस मीटर रुंद रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन वडाळा रोडपर्यंत. उत्तरेकडे ३० मीटर रुंद रस्त्याने पूर्वेकडील भाग घेऊन पॅराडाईज गार्डनपर्यंत. वडाळा पाथर्डी रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन न्यू विनय किराणा दुकानापर्यंत. दीपालीनगर रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन चंद्रकिरण सोसायटीपर्यंत. कॉलनी रस्त्याने दक्षिणेकडे गुरुकृपा बंगला, पश्चिमेकडे कॉलनी रस्त्याने उत्तरेकडील सेजल पार्क, बॉक्स नाल्यावरील रस्त्यापर्यंत. उत्तरेकडे दीपालीनगर रस्त्यापर्यंत, दीपालीनगर रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन मुंबई- आग्रा महामार्ग सर्व्हिस रस्त्यापर्यंत.
पश्चिम ः मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन सर्व्हीस रस्त्याने दीपालीनगर रस्ता चौकापासून उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन जुना मुंबई नाका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नंदिनी पुलापर्यंत.
हे आहेत इच्छुक
सतीश कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, तेजल वाघ- पाटील, रूपाली निकुळे, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा, नीलिमा आमले, जयेश आमले, सुनील खोडे, संगीता खोडे, मुज्जमिल शेख, गणेश खोडे, जहीर शेख, अजय उन्हवणे, राहुल सोनवणे, राहुल गवारे, जितेंद्र भावे, नविंदर सिंग अहलुवालिया, चंद्रकांत बोंबले, वर्षा बोंबले, अनिता चिडे, निर्मला थेटे, योगेश म्हस्के, राजू थेटे, कौशल पाटील, श्याम हांडोरे, सुनील जाधव.
Web Title: Nashik Municipal Corporation Bjp Politics Power
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..