नाशिक : बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपची कसरत

‘ट्रिपल एम’ कार्ड ठरणार महत्त्वाचे

Nashik Municipal Corporation Election BJP exercise
Nashik Municipal Corporation Election BJP exercise sakal

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून भाजपला भरभरून मते देणाऱ्या इंदिरानगर प्रभाग क्रमांक २९ मध्ये यंदा वडाळा लगत असलेले सुमारे साडेसात हजार मुस्लिम मतदार समाविष्ट झाल्याने भाजपचा हा बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाला मोठी कसरत करावी लागेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रभाग ३० आणि २३ चा काही भाग मिळून या प्रभागाची निर्मिती झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भागात असलेले ब्राह्मण मतदार आणि सर्वसामान्य भाजपप्रेमी जनतेमुळे हा परिसर तसा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. अर्थात यापूर्वी मनसे आणि शिवसेनेलादेखील येथून यश मिळाले असले तरीदेखील पाया मात्र भाजपचाच येथे भक्कम आहे. त्यात वडाळा गावाचा यंदा समावेश झाल्याने आणि तेथील भूमिपुत्र सुनील खोडे आणि नगरसेविका सुप्रिया खोडे यांनी गावावर बऱ्यापैकी पकड ठेवल्याने माळी, मराठा आणि ब्राह्मण या समीकरणावर भाजप निश्चिंत असली तरी सक्षम मराठा उमेदवाराचा मात्र शोध घेणे सुरू आहे.

दरम्यान, मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊन माजी आमदार वसंत गिते यांनी वडाळा गावातील डझनभर मुस्लिम इच्छुकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाले तर मात्र सेनेचे मराठा, माळी आणि मुस्लिम कार्ड भाजपच्या या गडाला हादरे देऊ शकते. मोठ्या संख्येने असलेले इच्छुक भाजपची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

भाजप नेतृत्वाची कसोटी

ज्येष्ठ नेते विजय साने यांचे चिरंजीव ॲड. अजिंक्य साने आणि विद्यमान नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यात उमेदवारीसाठी घमासान ठरले आहे, तर दुसरीकडे प्रभाग २३ चे नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनीदेखील येथून दावेदारी केल्याने पक्षापुढे पेच वाढला आहे. मोठ्या संख्येने असलेल्या इच्छुकांचे कसे समायोजन करायचे यात भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या प्रभागात यंदा विनय नगर, खोडे नगर आदी भागाचादेखील समावेश झाल्याने आणि इंदिरानगरचा कोअर भाजप मतदार असलेला भाग शेजारच्या प्रभाग ३९ मध्ये समाविष्ट झाल्यानेदेखील भाजपसाठी काही प्रमाणात अडचणीचे ठरू शकते. सेनेला मुळातच येथे कार्यकर्त्यांचा वानवा आहे. भाजपच्या अडचणी वाढल्या असल्या तरीदेखील भाजपला हरवण्यासाठी सेनेला मोठी ताकद लावावी लागेल हे नक्की. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील या भागात मतदार नोंदणी अभियानाद्वारे आपले अस्तित्व ठळक केले आहे. विशेषतः मुस्लिम मतदार राष्ट्रवादीकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त आहे. या प्रभागात जितक्या जोमाने राष्ट्रवादी लढेल, तितके भाजपच्या विजयाची संधी अधिक राहील अशी शक्यता आहे.

प्रभागाची व्याप्ती

साईनाथनगर, श्रीजयनगर, राजसारथी सोसायटी, रथचक्र सोसायटी, बजरंग सोसायटी, झेडपी कॉलनी, जाखडीनगर, महारुद्र कॉलनी, गजानन महाराज मंदिर रोड परिसर, एसबीआय कॉलनी, आदर्श कॉलनी, सीटी गार्डन परिसर, वडाळा गाव, झेनिथ हॉस्पिटल, अशोका स्कूल, जेएमसीटी कॉलेज, अशोका हॉस्पिटल.

  • उत्तर ः मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनच्या सर्व्हिस रस्त्यावरील जीवन पुष्प अपार्टमेंटपासून दीपालीनगर रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन बॉक्स नाल्यापर्यंत. बॉक्स नाल्याने दक्षिणेकडे व पूर्वेकडील धनश्री अपार्टमेंट, कॉलनी रस्त्याने दक्षिणेकडील भागाने अण्णाई बंगला घेऊन उत्तरेकडे कॉलनी रस्त्याने उत्तरेकडील सिद्धिविनायक अपार्टमेंटपर्यत. दीपालीनगर रस्त्याने पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन १८ मीटर डीपी रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत. उत्तरेकडे १८ मीटर रुंद रस्त्याने पूर्वेकडील भागाने नाशिक शिवार सर्व्हे क्रमांक ८६५ ची खुली जागा घेऊन व ३० मीटर रुंद रस्त्याने, पश्चिमेकडील भाग घेऊन ३० मीटर डीपी रस्त्यापर्यंत. पूर्वेकडे ३० मीटर रुंद डीपी रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन अशोका शाळा, अठरा मीटर रुंद पखाल रोडपर्यंत.

  • पूर्व ः ३० मीटर रुंद रस्त्यावरील अशोका शाळेपासून १८ मीटर रुंद पखाल रोड रस्त्याने विठ्ठल मंदिर रोडपर्यंत, कॅनॉल रोडने म्हसोबा महाराज चौकापर्यंत.

  • दक्षिण ः म्हसोबा महाराज चौक, वडाळा चौफुलीपासून राजसारथी सोसायटी मागील चौकापर्यंत, पवननगर दत्तमंदिर चौकापर्यंत पुढे अंतर्गत रस्त्याने वडाळा पाथर्डी रस्त्यापर्यंत, बापू बंगला चौक, बापू बंगला चौकाने गजानन महाराज मंदिर रस्त्यापर्यंत. गजरा पार्कचे मागील बाजूने हॉटेल ग्रेट पंजाबपर्यंत.

  • पश्चिम ः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हॉटेल ग्रेट पंजाबपासून सर्व्हिस रस्त्याने मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीनच्या सर्व्हिस रोडवरील जीवन पुष्प अपार्टमेंटपर्यंत

हे आहेत इच्छुक

चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. अजिंक्य साने, जगन पाटील, प्रकाश खोडे, आकाश खोडे, प्रवीण जाधव, संजय गायकर, ॲड. भानुदास शौचे, जय कोतवाल, सुनील देसाई, ॲड. श्यामला दीक्षित, धीरज भोसले, पद्मिनी वारे, संकेत खोडे, दत्ता दंडगव्हाळ, ह्णषिकेश वर्मा, सरप्रीतसिंग बल, राजश्री शौचे, कलीम शेख, नईम शेख, आशाबी शेख, शरीफ शेख, नवाब शहा (दादा हाजी), खलिल शेख, असिफ शेख, साझिया शेख, मुन्नीबाई पठाण, सादाब सय्यद, शाहीन रंगरेज (सय्यद), ऐश्वर्या गायकवाड, नेहा म्हैसपुरकर, सोनाली कुलकर्णी, आदित्य दुसाने.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com