esakal | नाशिकला ऑक्सिजनची रोज १२२ टनची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen

नाशिकला ऑक्सिजनची रोज १२२ टनची गरज

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाविरुद्ध लढाईत रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती निवळली असून, दिवसभरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करून उत्पादकांकडे ३० ते ४३ टनांपर्यंत ऑक्सिजन शिल्लक राहिला. मंगळवारी (ता. ४) रुग्णालयांना १२२.२० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आजच्या पुरवठ्यासाठी २४.८० टन ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे.

रोजची गरज १२२ टन

सनी इंडस्ट्रिअलने ४.०२, अक्षय ऑक्सिजनने २.५४, रवींद्र ऑक्सिजनने १०.२७, तर सिन्नरच्या स्वस्तिक एअरने ३.५० अशा एकूण २०.३३ टन ऑक्सिजनचे उत्पादन केले. याशिवाय पिनॅकलने ४२.७०, निखिल मेडिकोने ४.५२, श्रीगणेशने ५५.६५ अशा एकूण १२३.२० टन ऑक्सिजनचे रिफिलिंग केले. शिल्लक साठा २३.८० टन होता. अशा पद्धतीने दिवसभराच्या पुरवठ्यासाठी १४७ टन ऑक्सिजनची उपलब्धता झाली होती. मंगळवारी (ता. ४) २० टन लिक्विड ऑक्सिजन थेट संस्थांना उपलब्ध झाला होता. रिफिलर्सना ८६ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाला.

हेही वाचा: नोकरभरतीच्या विलंबामुळे तरुणांच्या मेहनतीवर पाणी; वय वाढल्याने भीती

शिल्लक साठ्याचे प्रमाण निम्म्याने घटून २४ टनांवर

ऑक्सिजनची उपलब्धता वाढत असताना रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा खप वाढल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयांना दोन दिवस पुरेल इतकी ऑक्सिजनची उपलब्धता व्हायला हवी, अशी सूचना यंत्रणेला केली होती. त्याच वेळी ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना केंद्राच्या वैद्यकीय सल्लागारांचा दाखला देऊन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उल्लेख केला. त्याचबरोबर राज्यातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याची बाब अधोरेखित केली.

ऑक्सिजन प्रकल्पांना हवीय गती

जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे तिसऱ्या लाटेविषयी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उल्लेखाचा विचार करता, जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. तसे न घडल्यास पहिल्या आणि आताच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या झालेल्या हालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?