Nifad: नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट

निफाड : नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट

निफाड गोदावरी कादवा, विनता या नद्या आणि यंदाच्या पावसाने काठोकाठ भरलेले जलाशय तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे पक्षी अभयारण्य पक्ष्यांचे आवडते ठिकाण बनले आहे. यंदाच्या पक्षी हंगामाला सुरवात झाली असून, नांदूरमधमेश्वरच्या जलाशयावर २० हजारांहून अधिक परदेशी पाहुणे मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे सध्या अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी अन्‌ सकाळ- सायंकाळी विविध पक्ष्यांचे गुंजणारे सुमधुर सूर मंत्रमुग्ध करणारे आहेत.

यंदाच्या काहीशी लांबलेल्या पानकळ्यामुळे हिवाळा उशीरा सुरू झाला. त्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाला उशीर झाला. जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र नांदूरमध्यमेश्वर धरण आणि गोदावरीसह तिच्या उपनद्या आणि बंधाऱ्यांवर देश विदेशातील हजारो पक्ष्यांचे थवे दाखल झाले आहेत. काही पक्षी निफाड शहर आणि परिसरातील वृक्षराजींवर मुक्कामाला आले आहेत. यात खास करुन रोझी पास्टर (गुलाबी मैना) यांचे आगमन गतवर्षी लांबणीवर पडले होते. दरवर्षी लाखो रोझी पास्टर निफाड शहरात दाखल होतात. त्यामुळे साहजिकच निफाडकर त्यांच्या आगमनासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. हंगामात रोझी पास्टर लवकर येतील अशी आशा आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

निफाड शहर आणि परिसरात हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या आणि सायंकाळच्या वातावरणातील अंगाला झोंबणारा गारवा आणि पक्ष्यांचे परिसरात गुंजणारे विविध प्रकारचे आवाज वेगळ्या माहोलमध्ये घेऊन जाणारे आहेत. यात प्रामुख्याने राँबीन, बुलबुल, गप्पीदास, वटवट्या, मैना, साळुंखी, रोझीपास्टर, नाचन, वटवाघुळ, सुतार, हुदहुदे, ब्राऊन, थ्रेशर, बंटीग, कुदळे, पाकोळी, जांबळी पाणकोंबडी, आयबीज, भारद्वाज, पिंगळ यांच्यासह शेकडो प्रजातींचे पक्षी आपल्या गुंजनातून वातावरण भारावून टाकत आहेत. या पक्ष्यांच्या आवाजाची अनुभूती घ्यायची असल्यास निफाड शहर परिसरातील जलाशय, माळरान, शेत शिवारात शांतपणे आवाजांचा बोध घेतल्यास आणि स्वतः व्यक्त होण्यापेक्षा पक्ष्यांच्या आवाजांकडे लक्ष एकाग्रतेने दिल्यास आपल्याला पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण आवाजांचे भावविश्व अनुभवाला येईल हे निश्चित.

यंदा गोदावरी तिच्या उपनद्याबंधारे काठोकाठ भरल्याने पक्षांसाठी मोठा जलसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या पक्षी हंगामाला सुरुवात झाली असून हजारो देशविदेशातील पक्ष्यांचे थवे गोदेच्या खोऱ्यात दाखल झाले आहेत. पक्षीप्रेमी नागरिकांनी या अद्बभुत वातावरणाचा आनंद घ्यावा.

- राहुल वडघुले, निफाड

loading image
go to top