पान-२
नाशिकमध्ये शनिवारपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’
आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी ः सुरक्षेच्यादृष्टीने पोलिस आयुक्तांचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसर हा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्र व ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ म्हणून घोषित केला आहे. या कार्यक्षेत्रात ड्रोन उडविण्यास २९ तारखेच्या मध्यरात्रीपासून ते शनिवारी (ता ३१) मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंध लागू राहणार आहे. या क्षेत्रात ड्रोन उडविणे, ड्रोनद्वारे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करणे तसेच ड्रोनचा वापर करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील रामतीर्थ, गोदाघाट परिसर तसेच देवमामलेदार मंदिर येथे ड्रोन हल्ल्यांच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रोनचा वापर करून घडविण्यात आलेल्या विविध हल्ल्यांच्या घटनांचा विचार करता, सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि संभाव्य धोके टाळणे आवश्यक असल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून्स, मायकोलाइट एअरक्राफ्ट तसेच तत्सम हवाई साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अशा साधनांचे उड्डाण किंवा वापर करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम, भारतीय विमान अधिनियम 1934 व तसेच अन्य प्रचलित कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त कर्णिक यांनी आदेशात नमुद केले आहे.
----------------