पिंपळगावात आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

नाशिक : पिंपळगावात आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत

sakal_logo
By
एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्या वाराईच्या दरवाढीवरून उद्भवलेल्या संघर्षावर अखेर पडदा पडला आहे. कांदा चाळीवरील माथाडी कामगारांना वाराईच्या दरामध्ये पंधरा टक्के वाढ देण्यास कांदा व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. यासह कामगार आयुक्तांनीही कांदा व्यापाऱ्यांकडून दरवाढ मिळवून देण्याची हमी घेतली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडत उद्यापासून (ता.१२) कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार आहेत.

पिंपळगाव बाजार समितीत शंभराहून अधिक व्यापारी व त्यांच्या कांदाचाळीवरील सुमारे तीनशे माथाडी कामगार यांच्यात वाराईच्या दरवाढीवरून संघर्ष पेटलेला होता. व्यापारी व कामगार यांच्यात दर तीन वर्षांनी लोडिंग, वजन काटा व शिलाई यासह वाराईसाठी करार होत असतो. महिनाभरापासून व्यापारी व कामगार यांच्यात दरवाढ चर्चेचा काथ्याकूट सुरू होता. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कराराला मूर्त स्वरूप आले नाही. कामगारांनी मागणी केलेली साठ टक्के दरवाढ व्यापाऱ्यांनी फेटाळली होती. त्यामुळे कांदाचाळीवरील तीनशे कामगारांनी दोन दिवसापासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. कांदाचाळीवर वाराईच्या कामासाठी कामगार नसल्याने व्यापाऱ्यांनीही कांदा खरेदीसाठी असमर्थता दर्शविली होती.

पिंपळगाव बाजार समितीत मंगळवार बुधवार असे दोन दिवस कांद्याचे लिलाव ठप्प होते. सुमारे 40 हजार क्विंटल कांद्याच्या लिलाव होऊ शकले नाहीत. दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. पिंपळगाव बाजारसमितीचे सभापती आमदार दिलीप बनकर व कामगार आयुक्त यांनी व्यापारी व कामगार यांच्यात समेट घडविण्यासाठी मध्यस्थी केली.

हेही वाचा: रिसोड : एसटी संपावर, डल्ला प्रवाशांच्या खिशावर

व्यापारी असोसिएशनने आज सकाळी बैठक घेतली. माथाडी कामगारांनी दोन पावले मागे घेत ६० टक्क्यांची मागणी १५ टक्क्यांपर्यत खाली आणली. पंधरा टक्के दरवाढीची मागणी व्यापाऱ्यांनी मान्य केल्याने वादावर पडदा पडला आहे. माथाडी कामगार शुक्रवारपासून कांदाचाळीवर वजनकाटा, शिलाई व पॅकिंगसाठी कामावर हजर होणार आहेत.

वाराईच्या दरवाढीच्या मागणीबाबत कामगार आयुक्तांनी हमी घेतली आहे. व्यापाऱ्यांनीही पंधरा टक्के दरवाढीला समर्थता दर्शवली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही कामावर हजर होत आहोत.

- दीपक दौडकर, पदाधिकारी, माथाडी कामगार संघटना.

माथाडी कामगारांनी गैरसमजातून संप केला. चर्चेतून मार्ग काढता आला असता. व्यापाऱ्याची बैठक झाली असून कामगारांनी संप मागे घेतल्याने शुक्रवारपासून व्यापारी कांदा खरेदीसाठी लिलावात सहभागी होतील.

- हसमुख शहा, पदाधिकारी, कांदा व्यापारी असोसिएशन.

loading image
go to top