esakal | धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : ऑक्‍सिजन गळती घटनेनंतर रुग्‍णालयातील यंत्रणा, रुग्‍णांचे नातेवाईकांसह अन्‍य घटकांची उडालेली तारांबळ हृदयात धडकी भरणारी ठरली. जाकीर हुसेन रुग्‍णालयात ऑक्‍सिजनअभावी रुग्‍णांची तरफड होत असताना त्‍यांना बचावासाठी मिळेल त्‍या माध्यमातून ऑक्‍सिजन सिलेंडर आणण्याची धडपड सुरु होती. तर मृतांच्‍या नातेवाईकांचा आक्रोश, हुंदक्‍यांनी कथडा परीसरासह संपूर्ण नाशिक सुन्न झाले होते.

गळतीनंतर रुग्‍णांना आवश्‍यक ऑक्‍सिजन उपलब्‍धतेसाठी यंत्रणेसह रुग्‍णाच्‍या नातेवाईकांची धडपड सुरु झाली. काहींनी दुचाकी वाहनावरुन, काहींनी खासगी चारचाकीतून, ऐरवी रुग्‍ण आणण्यासाठी वापर होणाऱ्या रुग्‍णवाहिकेपासून तर थेट अतिक्रमण हटविण्यासाठीच्‍या महापालिकेच्‍या ट्रकमधूनही ऑक्‍सिजनचे सिलींडर आणण्यात आले. काही रुग्‍णांना खुर्चीवर बसवत तर काहींना खाटांवर बसवत ऑक्‍सीजनद्वारे जीवनदान देण्याचे कार्य सुरु झाले. परीस्‍थितीचे गांभीर्य बघता काही रुग्‍णांना रुग्‍णालयाच्‍या आवारातच नातेवाईकांच्‍या चारचाकीत झोपवून तेथे ऑक्‍सीजनचा पुरवठा करण्यात आला. घटनेनंतर अनेक तास परीस्‍थिती सुरळीत करण्यासाठी यंत्रणेसोबत रुग्‍णांच्‍या नातेवाईकांची फरफट सुरु होती. ऑक्‍सीजन गळतीचे काही मिनीटे व त्‍यानंतर रुग्‍णांना वाचविण्याच्‍या धडपडीतील काही तास संपूर्ण यंत्रणा, रुग्‍णांचे नातेवाईक यांची धावपळ व तळमळीचे दृश्‍य अंगावर काटा आणणारे होते.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : मृत्यूतांडव.. हाहाकार! सखोल चौकशीची मागणी

img

Nashik oxygen leak accident

रुग्‍णाच्‍या नातेवाईकांकडून सीपीआर, अंगावर क्षहारे आणणारे

ऑक्‍सीजन पुरवठा खंडीत झाल्‍यानंतर अत्‍यवस्‍थ झालेल्‍या रुग्‍णांना वाचविण्यासाठी तेथे उपस्‍थित आरोग्‍य सेवक, कर्मचार्यांसह रुग्‍णांच्‍या नातेवाईकांकडून जीवाच्‍या आकांताने धडपड सुरु झाली. रुग्‍णांच्‍या नातेवाईकांकडून सीपीआर अर्थात बंद पडलेले हृदय पुन्‍हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्‍न सुरु झाले. छातीवर दाब देऊन हृदय सुरु करणाऱ्या नातेवाईकांचे दृष्य अंगावर क्षहारे आणणारे होते. रुग्‍णाकडून प्रतिसाद मिळत नसतांनाही कुटुंबियांकडून सुरु असलेल्‍या प्रयत्‍न पाहतांना अक्षरशः मन सुन्न होत होते. आपल्‍या रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती मिळाल्‍यावर अनेक नातेवाईकांचा संताप अनावर झाल्‍याचे बघायला मिळाले.

img

relative

img

ambulance

जीवावर उदार होत मदतकार्य

डॉ.जाकीर हुसेन रुग्‍णालयात कोरोना रुग्‍ण दाखल असतांना अनेक स्‍वयंसेवक व रुग्‍णांच्‍या नातेवाईकांनी जीवावर उदार होत मदतकार्यात हातभार लावत, माणूसकी अद्यापही जीवंत असल्‍याची प्रचिती दिली. ऑक्‍सिजनचे सिलींडर वाहनतांना, गर्दी कमी करतांना व रुग्‍णालयातील अन्‍य कामकाजात कर्मचाऱ्यांना हातभार लावतांना अनेक स्‍वयंसेवकांची धडपड सुरु होती.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू; जिल्हाधिकारींची माहिती

img

oxygen cylinder