Latest Marathi News | कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Natya Compition

Rajya Natya Compition : कसब पणाला लावून उभा केला ‘गावगाडा’

नाशिक : ग्रामीण भागात घडणाऱ्या विविध घटना, प्रसंग, त्यातून निर्माण होणारे विविध विनोद, प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य यासारखे नानाविध बारकावे टिपणाऱ्या कथानकाचे नाट्य रूपांतर आणि तब्बल २५ ते ३० कलावंतांची मोट बांधून ते नाटक स्पर्धेत सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न ‘पाकिस्तानचे यान’ या नाटकानिमित्ताने बघावयास मिळाला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (ता. २५) नारायणी फाउंडेशनच्या संघाने हे नाटक सादर केले. गावगाडा म्हटला की भाऊबंदकी, खालचे-वरचे असा वाद, जुन्या रूढी-परंपरा, प्रेमाचे लागेबांधे, सरपंच-पाटील यांचा दरारा, त्यांच्या हस्तकांचा रुबाब, देवी अंगात येणे, त्यातही तुमचा देव अन्‌ आमचा देव असा भेदभाव यासारख्या अनेक गोष्टी बघावयास मिळतात. (Nashik Rajya Natya Competition Drama Pakistan Che yan Housefull Nashik News)

मात्र, एखादे सार्वजनिक संकट येण्याचे संकेत मिळताच हीच गावगाड्यातील भोळीभाबडी जनता आपसांतले सारे वाद विसरून एकत्र येते अन्‌ संकट टळल्यावर एकदाच सगळे मिळून जल्लोष करतात. नाटक रंगमंचावर सादर करणे तसे कठीणच होते. तरीही दिग्दर्शक अभिजित गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी हे आव्हान लिलया पेलले.

अरविंद जगताप यांच्या कथेचे विक्रांत धिवरे यांनी केलेले नाट्य रूपांतर यातील छोट्या-छोट्या प्रसंगांमुळे लाजवाब ठरले. अक्षय अशोक यांनी निर्मिती सूत्रधार म्हणून संपूर्ण कसब पणाला लावल्याने कलावंतांचा एवढा मोठा लवाजमा सांभाळणे त्यांना सहज शक्य झाले.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ग्रामीण भागाला अनुरूप कविता, गोंधळ गीत यासारख्या बाबी आशिष चौधरी यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. तर प्रतीक चंद्रमोरे यांचे नृत्य दिग्दर्शन व सुमीत देशपांडे यांचे पार्श्‍वसंगीतही वाखाणण्याजोगे होते. त्यांना वैभव गायकवाड यांचे ढोलकी वादन आणि साहिल गायकवाड यांच्या संभळ वादनाने उत्तम साथ दिली.

प्रकाश योजनेची जबाबदारी स्वत: श्री. धिवरे यांनी अत्यंत कसोशीने सांभाळली. आकर्ष ललवाणी व अनिरुद्ध पाटील यांचे नेपथ्यदेखील कथानकाला साजेसे होते. अनन्या शिंदे व सपना चौधरी यांची वेशभूषा आणि निकिता लोंढे व लीना चौधरी यांची रंगभूषाही प्रेक्षकांना थेट गावाचे दर्शन घडविण्यात यशस्वी ठरली.

एकूणच, मोठा लवाजमा आणि वैविध्यपूर्ण छोट्या-छोट्या प्रसंगांच्या माध्यमातून नाट्य लेखन व दिग्दर्शन या दोन्हीही बाजूंनी नाटकाला स्पर्धेत ठामपणे उभे केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नाट्यगृहात बसायला जागा मिळत नव्हती, एवढी गर्दी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकास बहुधा पहिल्यांदाच झाली असावी.