esakal | स्वच्छ सर्वेक्षण 2020: प्रतिसादाने कमावले, डेब्रिजने घालविले! 
sakal

बोलून बातमी शोधा

nashik city 3.jpg

स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचे नाशिककरांचे स्वप्न एक अंकाने भंगले असले तरी ६७ वरून ११ व्या स्थानावर घेतलेली झेप हेही नसे थोडके म्हणत नाशिककरांनी आता पुढील वर्षासाठी कंबर कसली आहे. अर्थात यंदाही नाशिककरांचा प्रतिसाद ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण 2020: प्रतिसादाने कमावले, डेब्रिजने घालविले! 

sakal_logo
By
विक्रांंत मते

नाशिक : स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचे नाशिककरांचे स्वप्न एक अंकाने भंगले असले तरी ६७ वरून ११ व्या स्थानावर घेतलेली झेप हेही नसे थोडके म्हणत नाशिककरांनी आता पुढील वर्षासाठी कंबर कसली आहे. अर्थात यंदाही नाशिककरांचा प्रतिसाद ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. 

प्रतिसादाअभावी चांगल्या गुणांना महापालिकेला मुकावे लागले
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच नाशिक पहिल्या दहा शहरांमध्ये येईल, असा अंदाज व्यक्त केला जायचा. त्याला कारणही नाशिकचे हवामान, मोकळे रस्ते, प्रदूषणाचे अल्प प्रमाण व प्रत्येकाला नाशिकमध्ये राहण्याचा न आवरणारा मोह. असे असतानाही नाशिक स्वच्छ शहरांपासून दूर फेकले जायचे. गेल्या वर्षी स्टार मानांकनात झालेली घसरण वेदनादायी ठरली. सर्व बाबींमध्ये उत्तमता असतानाही नागरिकांच्या प्रतिसादात नाशिककर कमी पडायचे. पहिल्या वर्षी प्रशासनाने प्रयत्न करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी चांगल्या गुणांना महापालिकेला मुकावे लागले होते. यंदा मात्र सर्व घंटागाड्यांचे नियोजन, नालेसफाई, रस्त्यांची झाडलोट, हागणदारीमुक्तीसाठी राबविलेले अभियान या बाबी महत्त्वाच्या ठरण्याबरोबरच नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात महापालिका यशस्वी ठरली. यंदा तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांनी स्वच्छतेबाबत सकारात्मक अभिप्राय नोंदविल्याने महापालिका प्रशासनाच्या मेहनतीचे चीज झाले. 

प्रतिसादाने कमावले, डेब्रिजने घालविले!
दहा लाख लोकसंख्येच्या गटात नाशिकचा समावेश होता. शहरातील सार्वजनिक स्वच्छता, पाणी वितरण, मलनिस्सारण व्यवस्था, रोज गोळा केलेला घनकचरा यावर शास्त्रोक्त पद्धतीची विल्हेवाट, सार्वजनिक शौचालय तसेच वैयक्तिक शौचालयांची स्वच्छता यावर आधारित निकषावर नाशिक महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर अकरावा क्रमांक व महाराष्ट्रात दुसरा क्रमांक देण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण लीग स्पर्धा २०१६ पासून राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. नाशिक महापालिकेच्या २०१७ या वर्षात देशात १५१ वा क्रमांक, २०१८ या वर्षात ६३ वा, २०१९ या वर्षात ६७ वा क्रमांक होता. 

निकषाप्रमाणे उत्तम गुण 
स्पर्धेकरिता चार प्रकारचे निकष आहेत. २०२० या वर्षात सर्व निकषात उत्तम गुण प्राप्त झाले. त्यामुळे एकत्रित गुणांकात फायदा झाला. प्रत्यक्ष पाहणी गटात १,५०० पैकी १,४४१ गुण मिळाले. प्राप्त गुण नागरिकांचा सहभाग गटात १,५०० पैकी १,२५६ गुण मिळाले. सेवापातळी प्रगती गटात १,५०० पैकी १,३३२ गुण मिळाले. प्रमाणपत्रासाठी १,५०० पैकी ७०० गुण मिळाले. हागणदारीमुक्त शहर व सार्वजनिक स्वच्छतेकरिता चांगले गुण प्राप्त झाले. त्यातला एक भाग कन्स्ट्रक्शन व डिमोलेशन यात कमतरता असल्याने स्टार रेटिंगमध्ये एक स्टार प्राप्त झाला, अन्यथा नाशिक महापालिकेचा गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक प्राप्त झाला असता, असे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले. 


स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेला वरचा क्रमांक सर्व नाशिककरांच्या व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. पुढील वर्षाच्या स्वच्छ सर्वेक्षण लीगमध्ये उद्दिष्ट पूर्ण करून राष्ट्रीय स्तरावर प्रथम पाचमध्ये क्रमांक प्राप्त होईल, असे नियोजन करू. -राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका  

संपादन - ज्योती देवरे 

loading image
go to top