टूडे साठी
----------
साधुग्रामसाठी १९१ एकर भूसंपादनाला वेग
महापालिकेची जाहीर सूचना हरकतीसाठी १५ दिवसांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर साधुग्रामच्या भूसंपादनाला गती दिली जात असून महापालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. यात साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याबाबत महापालिकेने जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. भूसंपादनाबाबत कोणत्याही व्यक्तीला मालकी, भोगवटा, गहाण, भाडेपट्टा, वारसा किंवा न्यायालयीन वादासंदर्भात हरकत असल्यास ती १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुंभमेळा जवळ येत असल्याने प्राधिकरणाने साधुग्राम उभारणीच्या कामाला गती दिली आहे. यंदा भाविकांसह साधु-संतांची गर्दी वाढणार असल्याने आरक्षित ३३७ एकरचे भूसंपादन करण्यासोबतच १३८० एकर भाडेपट्टा जागेवर अतिरिक्त साधुग्राम उभारला जाणार आहे. भाडेपट्टा विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
-------------
२ हजार २६७ कोटींच्या निधीला मान्यता
साधुग्रामच्या भूसंपादनासाठी २,२६७ कोटी रुपयांच्या निधीसह प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होणार असली तरी, जमिनीचे दर अद्याप निश्चित झालेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महापालिकेने तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे.
---------------
सद्य:स्थिती काय?
तपोवनात साधुग्रामसाठी २८०.४६ एकर आणि संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर अशी एकूण ३७७ एकर जागा आरक्षित आहे. त्यापैकी ९४.०७ एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली असून, २८३ एकर क्षेत्र संपादन बाकी आहे. यातील १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ आणि लक्ष्मीनारायण मंदिराची गोशाळा आहे, तर १.५ एकरवर अभिन्यास मंजूर आहे. अनेक ठिकाणी मठमंदिरे उभी असल्याने उर्वरित २६८ एकरपैकी १९१.२१ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.