Inspirational Story : चीज पाववड्याने दिली ज्योतीताईंना ओळख

Inspirational Story : दुःख कोणाला नाहीय..? आयुष्य जगताना येणारा प्रत्येक दिवस संकटांबरोबरच संधीही घेऊन येत असतो.
Jyoti Jadhav
Jyoti Jadhavesakal

Inspirational Story : दुःख कोणाला नाहीय..? आयुष्य जगताना येणारा प्रत्येक दिवस संकटांबरोबरच संधीही घेऊन येत असतो. मात्र, पाहण्याची नजर सकारात्मक हवी... या विचारांवर तिचीही वाटचाल सुरू होती. सुखी संसाराची स्वप्न पाहत असतानाच पतीचं छत्र हरपलं... आयुष्य जगताना पुढे येणाऱ्या संकटांमध्ये खचून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, कुटुंबात जन्माला आलेल्या दोन्ही चिमुकल्यांसाठी ती लढत राहिली. (nashik sakal Inspirational Story Cheese pav vada gave recognition to Jyoti Tai in city marathi news)

कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी फरशी पुसण्यापासून ते चहाच्या गाड्यावर काम करीत आपला प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर तुटपुंज्या भांडवलावर रस्त्यावर स्वतः पाववडा विक्री सुरू करीत व्यवसायाला सुरवात केली. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सुगरणीची चव भक्कम करीत चीज पाववडा विक्रीतून शहरात स्वतःची ओळख उभ्या केलेल्या ज्योतीताई वाघ-जाधव यांचा प्रवास नक्कीच खचलेल्या मनांसाठी आधार ठरलाय.

ज्योती तुषार वाघ-जाधव... सासर दिंडोरी तालुक्यातील, तर माहेर नाशिकच्या वडाळा गावातील... दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेलं... रोजचा दिवस पुढे ढकलताना माहेरची परिस्थिती आव्हानं घेऊन येणारी... वडील केशव सावळीराम जाधव यांचे पत्नी सरलाबाई यांच्यासह दोन मुली व मुलगा असलेला परिवार... गवंडीकामातून मिळालेल्या पैशांतून केशव जाधव कुटुंबाला आधार देत होते. कुटुंबासाठी आधार म्हणून ज्योतीताई यांच्या आईही धुणीभांडी तसेच पडेल ते काम करीत राहिल्या. ज्योतीताई कुटुंबात ज्येष्ठ होत्या.

बालपणीच कष्ट नशिबी

अभ्यासात हुशार असूनही खेळण्या-बागडण्याच्या वयातच ज्योतीताई यांना वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच कुटुंबासाठी आधार देण्याची वेळ आली. वडिलांबरोबर सायकलवर विटा वाहण्यासाठी बांधकाम मजूर म्हणून त्या जात होत्या. शिकण्याची प्रबळ इच्छा असूनही केवळ परिस्थिती साथ देत नसल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. संपूर्ण कुटुंबाच्या नशिबी जणू कष्ट पुजलेले होते. त्यातच ज्योतीताई यांच्या विवाहाचा निर्णय घेतल्यावर सर्व स्वप्नांवर पाणी फेरले.

Jyoti Jadhav
Inspirational Story : थरथरत्या हातांच्या आधार बनल्या सुमनताई

आव्हाने उभी राहिली

ज्योतीताईंचा विवाह दिंडोरी तालुक्यातील तुषार वाघ यांच्याशी झाला. पती तुषार उच्चशिक्षित असल्याने स्वबळावर उभे राहताना ज्योतीताईंसाठीही ते बळ देत राहिले. याच काळात शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीसह एकत्र कुटुंबात शेती व्यवसायातही त्यांनी झोकून दिले. याच काळात मुलगा अर्जुन आणि दक्ष यांच्या निमित्ताने कुटुंबाची संख्या वाढली.

अर्जुन चौथीत, तर दक्ष पहिलीच्या वर्गात शिकत असतानाच ज्योतीताई यांचं कपाळावरचं कुंकू नियतीनं हिरावून नेल्यानं मात्र समोर अंधार पसरला. पतीचे छत्र हरपल्याने त्या खचल्या, मात्र दोन्ही मुलांना आधार महत्त्वाचा असल्याने त्यांनी आहे त्या परिस्थितीत स्वतःला सावरत थेट नाशिक गाठलं.

स्विगी डिलिव्हरी वूमन ते व्यावसायिक

माहेरी आल्यावर वडिलांच्या ओळखीतून नाशिकच्या इंदिरानगर परिसरात स्विगी काउंटरवर डिलिव्हरी वूमन म्हणून तुटपुंज्या पगारावर सुरवात केली. आयुष्यात आलेल्या परिस्थितीत जुळवून घेताना दिवस नक्कीच बदलतील, यावर ठाम राहत येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे त्या संधी म्हणून पाहत राहिल्या.

Jyoti Jadhav
Inspirational Story : अंधत्वावर मात करीत मिळविली रेल्वेत नोकरी

वर्षभर येथे काम केल्यावर ज्योतीताई यांनी परिसरात एका इडलीच्या दुकानात झाडू-फरशी, भांडी धुण्याची नोकरी पत्करली. या ठिकाणी साफसफाई करण्याबरोबरच त्यांनी रोजच्या वस्तू तयार करण्याचे कामही शिकून घेतले. दोन्ही मुलांसाठी भक्कम आधार व्हायचा असेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या दिशेने तयारी सुरू केली.

रस्त्यावरील पाववडा विक्री

तुटपुंज्या भांडवलातून अशोका मार्ग परिसरात रस्त्यावर टेबल टाकून ज्योतीताई यांनी सकाळी पाववडा, समोसा विक्री सुरू केली. याच काळात कोविडची साथ आली, मात्र त्या खचल्या नाहीत. त्यांच्यातील सुगरणीने तयार केलेल्या पदार्थांमध्ये चीज पाववडा, चीज सँडवीच, चीज समोसा विक्री त्यांच्यासाठी एक आगळी ओळख ठरली.

त्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ज्योतीताईंचा चीज पाववडा या परिसरात अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. प्रारंभी दिवसाकाठी २०० रुपयेही मोबदला मिळत नसलेल्या ज्योतीताई यांना चीज पाववडा विक्रीतून आर्थिक स्थैर्य मिळत गेले. चीजपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे परिसरात मिळालेली ओळख नक्कीच बळ देणारी असल्याचेही त्या सांगतात.

Jyoti Jadhav
Inspiring Story : गणेश जोगदंड बनला सांख्यिकी सहाय्यक

खचून जाऊ नका

कुटुंबासाठी ऐन उमेदीच्या काळात पतीचं छत्र हरपलेल्या ज्योतीताई यांनी मुलगा अर्जुन व दक्ष यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. स्वतः हुशार असूनही केवळ अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटलेल्या ज्योतीताई यांनी अर्जुन याने शासकीय अधिकारी व्हावे, तर लहान मुलगा दक्ष याने देशसेवा करावी, असा मनोदय बोलून दाखविला.

आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून प्रत्येकाने वाटचाल केल्यास नक्कीच मार्ग सापडतो, असे सांगणाऱ्या ज्योतीताईंना आयुष्यातील वाटचालीत मुलांबरोबरच बहीण आरती यांच्यासह माहेरच्या मंडळींनी दिलेली साथ मोलाची असल्याचेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

Jyoti Jadhav
Inspirational Story: मद्याच्या प्याल्याला ठोकर मारून श्‍यामच्या संसाराची गाडी रूळावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com