H31252, 53, 54, 55, 56, 57, 58, 59
सामाजिक दुही माजविण्याचा प्रयत्न
---
आनंदराज आंबेडकर : हिवाळी अधिवेशनाला घालणार घेराव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : केवळ सत्ता राखण्यासाठी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा घाट घातला जात असून, त्याविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. सामाजित दुही माजविण्यासाठी मातंग समाजाला हाताशी धरले जात असून, यात मराठा आरक्षणाबाबत जो खेळ विद्यमान सरकारने केला आहे, तोच खेळ मातंग समाजाचा होईल. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार दिलेले आरक्षण मोडीत काढण्यासाठी उपवर्गीकरणाविरोधात नागपुरातील हिवाळी अधिवेशनालाच घेराव घातला जाईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
उपवर्गीकरणविरोधी कृती समितीतर्फे शनिवारी (ता. ३) अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल, शालिमार, नेपाळी कॉर्नर, बागूल कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, की आंध्र प्रदेशात अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाबाबत हैदराबाद उच्च न्यायालयाने अमान्य केले आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना दिले. त्याच आधारे राज्यातील शासन उपवर्गीकरणाचा घाट घालत असून, यामुळे अनुसूचित जातीत दुही पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला न जुमानता राज्यभर लढा उभारला असून, मनुवाद्यांना त्यांचे राज्य प्रस्थापित करावयाचे आहे; परंतु नवीन पिढी जागरुक झाली असून, येणारा काळ आंबेडकरी विचारांचा असेल. सरकारने ऐकले नाही, तर २५ लाख बांधव नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी घेराव घालतील, असा इशाराही दिला.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर ॲड. गुणरत्न सदावर्ते, कृती समितीचे प्रा. कुणाल वाघ, दीपक डोके, संजय साबळे, सुरेश माने, रुख्मिणी लोंढे, किशोर घाटे, शशिकांत उन्हवणे, राहुल जगताप, अविनाश शिंदे, सुनील साळवे, अमर कसबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
....
...तर ४८ तासांत स्थगिती
या वेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उपवर्गीकरणाच्या घाटाला विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. सध्या संविधानाविरोधात राजकारण सुरू आहे. शासनाने जरी उपवर्गीकरण लागू केले, तर त्याला ४८ तासांत स्थगिती आणली जाईल; परंतु शिंदे यांच्याकडून मातंग समाजाचे ज्याप्रमाणे फूस लावून राजकारण केले जात आहे, त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापेक्षा इतरांना ते ज्याप्रमाणे एमआयडीसींमध्ये प्लॉट वाटप करतात, त्याप्रमाणे आमच्याही समाजबांधवांना द्यावे. शिंदे यांनी दळभद्री राजकारण करू नये, अशा शब्दांत टीका केली.
.....
वाहतूक कोंडी अन्...
दरम्यान, सदरचा मोर्चा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आला. यामुळे मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तसेच, सीबीएस सिग्नलवर मेहेर सिग्नलकडून येणाऱ्या मार्गावर सभामंडप उभारण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही सभा घेण्यात आली. यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. वाहतूक पोलिस शाखेसह सरकारवाडा, म्हसरूळ, आडगाव, गंगापूर पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.