esakal | पथदीपांचे काम एक, खर्च दोनदा..! स्मार्टसिटी कंपनीचा अजब कारभार
sakal

बोलून बातमी शोधा

nashik  news

पथदीपांचे काम एक, खर्च दोनदा..! स्मार्टसिटी कंपनीचा अजब कारभार

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत जुने नाशिक भागात विविध ठिकाणी रस्ते खोदाई सुरू असताना विद्युत पथदीप पोल बसविण्याचे कामदेखील सुरू आहे. परंतु, या भागात महापालिकेने वर्षभरापूर्वी पोल बसविले असताना कंपनीकडून पुन्हा त्याच पोल शेजारी नवीन पोल बसविण्याचे खर्चिक उद्योग सुरू आहे. काही भागातील चांगले विद्युत पोल काढून ते ठेकेदाराच्या खात्यात जमा होत असल्याने या अजब कारभाराविरोधात पालिकेच्या विद्युत विभागाने खरमरीत पत्र लिहून असे ‘उद्योग' बंद करण्याचा सल्ला दिला आहे. (Nashik Smart City Company street lighting work is in dispute)मागील आठवड्यात स्मार्टसिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात कंपनीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर कंपनीचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महापालिका व स्मार्टसिटी कंपनीने कामे हाती घेण्यापूर्वी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या होत्या. संवादाचा बार आठ दिवसातच फुसका ठरला आहे. गावठाण भागात महापालिकेने वर्षभरापूर्वी नवीन विद्युत पोल बसविले. चांगल्या स्थितीत असलेले पोलच्या जागी गावठाण विकासाचे विद्युतीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ते बदलले. बदललेले पोल महापालिकेच्या मालकीचे असल्याने पालिकेकडेच जमा करणे अपेक्षित असताना ते स्वतःकडे ठेवून घेतले. पोल बदलण्याची आवश्‍यकता नसताना नवीन पोल बसवून एकाच कामावर दोनदा खर्च करण्यात आला.


पालिकेच्या पत्राने प्रकार उघड

स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणातील ज्या भागामध्ये रस्ते खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या भागात पालिकेच्या विद्युत विभागाने सुमारे अडीच हजार पोल दीड वर्षापूर्वी बसविले आहे. ते पोल हटवून नवीन बसविले जात आहे. पोल बसविताना महापालिकेची मालमत्ता असताना ठेकेदाराने स्वतःकडे जमा करून घेतले आहे. रामवाडी ते मखमलाबाद दरम्यान नवीन विद्युत पोल बसविले असताना ते पोल हटवून नवीन पोल बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंचवटीतील आदर्शनगर, गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक ते लुथरा बंगला दरम्यान पालिकेचे पोल व स्मार्टसिटी कंपनीचे विद्युत पोल समोरासमोर उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद जवळ, कालिदास कलामंदिर व रावसाहेब थोरात सभागृहाजवळ सुस्थितीतील विद्युत पोल बदलून स्मार्टसिटी कंपनीतर्फे नवीन पोल बसविले जात असल्याचा प्रकार पालिकेच्या विद्युत विभागाने स्मार्टसिटी कंपनीला पत्राद्वारे कळविला आहे.

हेही वाचा: यूपीएससी परिक्षार्थीनी नाशिक केंद्र निवडावे : हेमंत गोडसे

स्मार्ट रस्त्यावर अंधार

अशोक स्तंभापासून रामवाडी पुलापर्यंत स्मार्टसिटी कंपनीने रस्ता तयार करून तीन महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी खुला केला आहे. परंतु, या भागात अद्यापही पथदीप बसविले नाही. पथदीप बसविण्यासाठी केबल टाकण्यात आली. ती केबल अर्धवट स्थितीत रस्त्यावर पडून असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर हा भाग अंधारात असल्याने तातडीने कारवाईची विनंती स्मार्टसिटी कंपनीकडे करण्यात आली आहे.
(Nashik Smart City Company street lighting work is in dispute)

हेही वाचा: पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात

loading image