
Nashik Sports News : क्रीडा स्पर्धांसाठी तरतूद 10 लाखांचा खर्च 18 लाख?
नाशिक : पुढील महिन्यात होत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धांसाठी यंदाच्या आर्थिक संकल्पात १० लाख रुपयांची तरतूद केली असताना, आणखी आठ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक स्पर्धेसाठी केवळ १० लाख रुपयांची तरतूद असताना प्रशासक कारकिर्दीत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेवर १८ लाख रुपये खर्चाचा घाट घातला आहे.
हेही वाचा: Sports Scholarship : क्रीडापटूंना नाशिक महापालिकेची शिष्यवृत्ती; असे असेल वितरण
जिल्हा परिषदेत गत दहा वर्षांपासून कर्मचारी क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. यावर्षी प्रशासकीय कारकिर्दीत कर्मचारी, अधिकारी क्रीडा स्पर्धा घेण्याचा दहा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मागील महिन्यात तयार करण्यात आला.
प्रशासक आशिमा मित्तल यांनी त्यास मंजुरी दिली. यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धेचा माहोल आहे. स्पर्धेसाठी इच्छुक कर्मचारी कार्यालयीन वेळेत सरावासाठी मैदानावर जाऊ लागले. अधिकारीही कर्मचाऱ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
हेही वाचा: Nashik Sports Update : रोइंगपटू अनुष्काची सुवर्णपदकावर मोहर; खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत निवड
अनेक वर्षांच्या खंडानंतर स्पर्धा होत असल्याने जिल्हा परिषदेत काम कमी आणि स्पर्धेची तयारी अधिक सुरू असल्याचे वातावरण आहे. या स्पर्धेत खेळाडूंना क्रीडा साहित्य, जेवण, ट्रॉफी, रोषणाई, म्युझिक व मैदान भाडे आदींसाठी खर्च केला जाणार आहे. क्रीडा स्पर्धेचा एकूण उत्साह बघून दहा लाख रुपये कमी पडतील, असे प्रशासनाला वाटल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी आणखी आठ लाख रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे.
म्हणजे क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १८ लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाबाजूला जिल्हा परिषदेच्या ३२०० शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणाऱ्या अध्यक्ष करंडक स्पर्धेसाठी सेस निधीमधून केवळ १० लाख रुपयांची तरतूद केली जाते. या अध्यक्ष करंडक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडवणे हा हेतू असूनही केवळ दहा लाखांची तरतूद केली जाते. दुसरीकडे प्रशासन स्वतःच्या मनोरंजनासाठी १८ लाख रुपये खर्च करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Sports Minister : आधी केली मैत्री, नंतर दिली प्रेयसी बनण्याची ऑफर; विनयभंगाचा आरोप होताच क्रीडामंत्र्यांचा राजीनामा
''जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कर्मचारी कल्याण निधी योजनेतून क्रीडा स्पर्धांसाठी सेस निधी वापरता येतो. त्याअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेसाठी सेसमधून निधीची तरतूद केलेली आहे.'' - आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद