पहिला लक्षवेधी सामना बडगुजर V/S शहाणे

बडगुजरांचा ‘अश्वमेध’ रोखण्यासाठी शहाणेंना आखाड्यात उतरविण्याची रणनीती
Shivsena-bjp
Shivsena-bjpsakal

सिडको : असं म्हणतात, की युद्ध, प्रेम, क्रिकेट आणि राजकारणात कधी काय होईल, ते कुणीच काही सांगू शकत नाही. अशाच प्रकारच्या काहीशा राजकीय घडामोडींना सिडकोत सध्या उधाण आले आहे आणि ते म्हणजे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या यशाचा ‘अश्वमेध’ रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांच्यासमोर चक्क नगरसेवक मुकेश शहाणे यांना मनपा निवडणुकीच्या आखाड्यात आमने-सामने लढविण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. यासंदर्भात भाजपच्या बड्या नेत्यांनी नुकतेच शहाणे यांना मुंबईत विशेष आमंत्रित करून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून तयारीला लागण्याचे संकेत दिल्याचेही समजते. जर का खरोखर प्रत्यक्षात अशा प्रकारचा दुरंगी सामना लढला गेला, तर येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीत ही लढत केवळ सिडकोवासीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण नाशिककरांसाठी लक्षवेधी लढत ठरू शकेल, यात तिळमात्र शंका नाही.

Shivsena-bjp
फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

बडगुजर यांचे बलाबल

शिवसेना महानगरप्रमुख झाल्यापासून सुधाकर बडगुजर यांनी संपूर्ण नाशिक शहर पिंजत भगवेमय वातावरण निर्माण केले आहे. महिला व पुरुषांच्या प्रत्येकी १२२ शाखांचा उद्‌घाटन सोहळा धूमधडाक्यात केला. भाजपवासीय माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल व माजी आमदार वसंत गिते यांचा शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला. शालिमार येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण केले. लाखोंच्या संख्येने दुबार मतदार नावनोंदणीचा घोटाळा बाहेर काढला. दिव्या ॲडलॅब्ज ते सिटी सेंटर मॉलपर्यंत २५० कोटींचा उड्डाणपूल मंजूर करत पुलाचे काम न झाल्यास राजकारण सोडण्याचीदेखील सिंहगर्जना करत चक्क महापौरांनाच आव्हान दिले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शड्डू ठोकत नाशिकमध्ये प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे धाडस बडगुजर यांनी दाखविल्याने ते शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनले, तर वरिष्ठांच्या नजरेत हिरो ठरले.

शहाणे यांचे बलाबल

भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांची आतापर्यंतची कारकीर्द काहीना काही कारणाने वादग्रस्त व धाडसी ठरली आहे. शिवसेनेचे नेते व माजी आमदार वसंत गिते हे त्यांचे राजकीय गुरू. यापूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याविरोधात अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले लक्ष्मण जायभावे यांचा त्यांनी गेल्या निवडणुकीत पराभव केल्याने ते जायंट किलर ठरले होते. पेलिकन पार्क प्रकल्पाचे श्री. शहाणेे हे शिल्पकार ठरले. राणे प्रकरणावरून भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केल्यानंतर प्रत्त्युत्तर दाखल भाजपमधून केवळ मुकेश शहाणे यांनी जिवाची पर्वा न करता मोठी हिंमत करत हातात फावडे घेत शिवसेना कार्यालयावर चाल केली होती. याबाबत मुंबईतील नेत्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप मारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com