esakal | नाशिक: वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागा धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Major crop damage at Dindori due to unseasonal rains nashik marathi news

नाशिक: वायुप्रदूषणामुळे द्राक्षबागा धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी: लखमापूर फाटा परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील फर्टिलायझर कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे तालुक्यातील परमोरी, ओझरखेड, अवनखेड परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधितांना प्रदूषण नियंत्रणाची सूचना द्यावी अथवा याबाबत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

हेही वाचा: व्यापाऱ्याचे टोमॅटोच्या मापात पाप; शेतकऱ्यांनी केला भांडाफोड

या परिसरातील शेतकऱ्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत पत्रकार परिषद घेऊन व्यथा मांडली आहे. या परिसरातील कंपनीचे धुरांडे उंच करणे गरजेचे आहे, त्यामुळे या परिसरात प्रदूषण वाढणार नाही याची काळजी घेता येईल, मात्र संबंधितांकडून तशी कोणताही उपाययोजना झालेली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ओझरखेड, परमोरी, वरखेडा, अवनखेड आदी परिसरात या कंपनीच्या प्रदूषणामुळे शेतात असलेल्या विविध पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींना निवेदन देण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या भेटी घेऊन व्यथा मांडली परंतु अद्यापि कार्यवाही झालेली नाही.

गेल्या पंधरा वर्षांपासून या परिसरातील शेतकरी त्रस्त झालेला असून शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याबाबत नुकतीच कृषी अधिकारींनी प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी केली, त्यावेळी प्रदूषणामुळे द्राक्षवेली, भाजीपाला यांची पाने करपत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी कंपनीच्या प्रदूषणामुळे ही पाने करपत असल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रदूषण करणा-या घटकांचा बंदोबस्त करावा असे सांगितले, पिकांचे पंचनामे करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही.

या परिसरात होणारे प्रदूषण त्वरित रोखावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या परिसरातील शेतकरी गंगाधर निखाडे, ज्ञानेश्वर तिडके, शालिमार काळोगे, सदानंद शिवले, वाल्मिक काळोगे, रमेश जाधव, संतोष जमधडे, गोरख बोराडे, विष्णू पाटील, नरेंद्र जाधव, राकेश दिघे, रोशन दिघे, रमेश दिघे, संदीप काळोगे आदी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

loading image
go to top