
नाशिक : रंगोत्सवात तरूणाई चिंब
नाशिक : करोना उद्रेकानंतर प्रथमच शुन्यावर आलेली रूग्णसंख्या, प्रशासनाने हटविलेले निर्बंध यामुळे आजच्या रंगपंचमीत रंगांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. शहर परिसरात प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या शहरातील पेशवेकालिन चारही रहाडींसह रेनडान्सचा आनंद घेत तरूणाई रंगोत्सवात ख-या अर्थाने चिंब झाली. प्रशासनाच्या मनाईनंतरही सायंकाळी उशीरापर्यंत शहरासह उपनगरे रंगोत्सवात न्हाऊन निघाली.
करोनामुळे गत दोन वर्षांपासून रंगपंचमीसह सर्वच सार्वजनिक धार्मिक सणउत्सवांवर गंडांतर आले होते. मात्र गत काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत जाऊन ती शुन्यावर आल्याने प्रशासनाने सार्वजनिक रंगपंचमी उत्सवाला परवानगी दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गल्लोगल्ली रेनडान्सचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ घेण्यासाठी तरुणांबरोबरच तरुणीही मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने दुपारी बारानंतर शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मेनरोड, गंगाघाटावर उसळली गर्दी
आगामी महापालिका निवडणुकांसाठी अनेकांनी तयारी केली आहे. त्यामुळे यावर्षी गल्लीबोळात रेनडान्सचे आयोजन करून युवकांना आकर्षिक करण्यात प्रयत्न करण्यात आला. मात्र माजी महापौर विनायक पांडे यांचे शिवसेवा युवक मित्र मंडळ, नगरसेवक शाहु खैरे यांच्या रोकडोबा तालीम संघ यांच्यातर्फे गंगाघाटावर आयोजित करण्यात आलेल्या रेनडान्ससाठी तरूणांसह तरूणींची मोठी गर्दी उसळली होती. ढोलताशांच्या आवाजावर थिरकणारी तरूणाई पाहण्यासाठी आबालवृद्धांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहराच्या सर्वच भागात मोठी गर्दी उसळली होती. शिवसेवा मित्र मंडळातर्फे रेनडान्ससह लहान मुलांसाठी रंगीत पाण्याच्या हौदाचेही आयोजन मेनरोडवर करण्यात आले होते. शहरात साक्षी गणेश मंडळ, सोमवार पेठेतील वेलकम फ्रेंडस सर्कल, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांचे प्रेरणा सांस्कृतिक मंडळ, बाळासहाबे कोकणे यांचे राजे छत्रपती सांस्कृतिक मंडळ आदींनी रेनडान्सचे आयोजन केले होते.
रहाडींवर जल्लोष
दुपारी दोननंतर विधिवत पुजन झाल्यावर जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, गंगाघाट व पंचवटीतील शनीचौक येथील रहाडी रंगप्रेमींसाठी खुल्या करण्यात आल्या. रहाडीत ‘धप्पा’ मारण्यासाठी तरूणाईत चांगलीच चढाओढ लागली होती. यंदा रहाडींना परवानगी िमळते की नाही, याबाबत शेवटपर्यंत साशंकता होती, परंतु पालकमंत्र्यांच्या सकारात्मकेनंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनीही परवानगीसाठी दिल्याने रंगोत्सवाची धूम याठिकाणी चांगलीच रंगली होती. सर्वच ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही.
Web Title: Nashik Youth Rangotsava Restrictions Removed Administration Rangpanchami
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..