नाशिक रोड- नाशिक रोड ते देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी (ता. १९) मध्यरात्री दीडनंतर विस्कळित झाली. दुपारपर्यंत सर्व गाड्या उशिराने धावत होत्या. अनेक रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला; तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. उशिरा धावणारा गाड्यांच्या प्रतीक्षेत प्रवासी स्थानकावर बसून होते. मार्ग बदललेल्या गाड्यांचे आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळली होती.