मेन
फोटो : B61056, B61051
--
घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
घरोघरी, मंदिरांमध्ये आदिशक्तीचा जयघोष; विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : घरोघरी आदिमाया भगवतीच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास रविवार (ता. ११) पासून सुरुवात झाली. अभिजित मुहूर्त साधत अनेकांनी घटस्थापना केली, तर सांडव्यावरची देवी, भद्रकाली माता, घनकर लेन व डांगर उतारावरील तुळजाभवानी मंदिरांमध्ये अनेक गृहिणीदेखील घटी बसल्या आहेत. देवीमातेचे नवरात्र साजरे करण्यासाठी घटी बसण्याची परंपरा आहे. मंगळवारी (ता. २०) दसऱ्याला उपवासाचे पारणे फेडण्यात येईल.
नवरात्र प्रारंभास घरोघरी घट स्थापन करण्यात येतो. घटाजवळ उगवणाऱ्या धान्याच्या रूपाने सृजन होते. चैतन्याची ही पखरण माणसातील तेज जागवते आणि जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी तो सज्ज होतो. देवी भगवतीच्या आशीर्वादातूनच हे सहज शक्य होत असल्याने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीदरम्यान नाशिक शहरातील पुरातन मंदिरांमध्ये देवीची उपासना करण्यात येते. यात दुर्गा सप्तशती पाठ, देवी अथर्वशीर्ष पाठ तसेच नवार्णव मंत्राची साधना महत्त्वाची असून अनेकजण गोदाघाटावरील सप्तशृंगी मंदिरामध्ये या साधनेसाठी बसतात. नऊ दिवसांमध्ये झालेल्या साधनेची विजयादशमीच्या दिवशी घटाच्या विसर्जनाने सांगता करण्यात येते. व्यंकटेश बालाजी ब्रह्मोत्सव आणि पद्मावती देवी नवरात्रोत्सवास गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. न्यासाचे विश्वस्त संजय चंद्रात्रे यांच्या हस्ते बालाजींची तर विश्वस्त आर्कि समृद्ध मोगल यांच्या हस्ते पद्मावती पूजनाचा शुभारंभ करण्यात आला. बालाजी मूर्तीस आकर्षक पुष्प सजावट आणि मंदिरास नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत संपन्न होणाऱ्या उत्सवात दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शंकराचार्य न्यासातर्फे करण्यात आले आहे .