NDCC Farmers Yojana : शेतकरी सभासदांसाठी ‘किसान अर्थ सहाय्य योजना’! थकबाकी वसुलीसाठी पाऊल | NDCC Farmers Yojana Kisan Artha sahay Yojana for farmer members Step for recovery of arrears nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDCC Bank

NDCC Farmers Yojana : शेतकरी सभासदांसाठी ‘किसान अर्थ सहाय्य योजना’! थकबाकी वसुलीसाठी पाऊल

NDCC Farmers Yojana : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी जुनी थकीत वसुलीवर लक्ष केंद्रित केले असून, आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी ‘किसान अर्थ सहाय्य योजना’ आणली आहे.

या योजनेंतर्गत थकबाकीदार सभासदांनी त्यांचेकडील येणे असलेले व्याज व मुद्दलाची रकमा भरल्यानंतर त्यांच्या कर्ज मंजुरी पत्रकामध्ये मंजूर असलेली रक्कम त्वरित वितरित होणार आहे. तसेच उर्वरित येणे रकमेचे हप्ते पाडून सभासदास ही रक्कम भरण्याची मुभा दिली जाणार आहे.

त्यामुळे जुन्या थकबाकीदार शेतकरी सभासदांनी या योजनेला लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंक प्रशासनाने केले आहे. (NDCC Farmers Yojana Kisan Artha sahay Yojana for farmer members Step for recovery of arrears nashik news)

गत ६-७ वर्षांत नोटाबंदी, शासकीय कर्जमाफीच्या घोषणा, कोरोना सदृश्य परिस्थिती, शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक वादळे या सर्व परिस्थितीमुळे थकबाकीदारांची इच्छा असतानांही थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा करू शकलेले नाही.

यामुळे शेतकरी सभासदांकडे मोठया प्रमाणावर थकबाकी झाली आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन खर्च भागवून थकीत कर्ज भरणा करणे अशक्य होत आहे. वसुली होत नसल्याने प्राथ. वि. का. संस्थांच्या व बँकेच्या ताळेबंदावर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

यामुळे संस्थेचे व बँकेच्या एन.पी.ए. च्या रक्कमेत सातत्याने वाढ होत आहे. या थकबाकीदार सभासदांकडे अनेकदा वसुलीकरिता पाठपुरावा झाला. यावेळी अनेक सभासदांनी कर्ज परतफेड करण्याची मानसिकता आहे.

परंतु बऱ्याच कालावधीपासून थकीत कर्ज असल्याने त्यावरील व्याजाचा बोजा वाढलेला असल्याने भरणा करणे शक्य होत नसल्याचे सांगितले. या थकबाकीदारांसाठी बँकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० व ४ टक्के व्याजदर सवलतीची सामोपचार कर्ज परतफेड योजना राबविली.

मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. थकबाकीची वसुली होणे आवश्यक असल्याने बँकेने राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा सचिव संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व गटसचिव तसेच शेतकरी यांच्याशी थकबाकीदार सभासदांना दिलासा देण्यासाठी व त्यांना थकबाकी भरणा करून परत नव्याने शासनाच्या योजनेनुसार मंजूर क.म. पत्रकातील पीक कर्ज शून्य टक्के दराचे कर्जास पात्र होऊन संस्थेचे आर्थिक प्रवाहात सामील होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर विचारमंथन झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यातच प्राथ. वि. का. संस्थेच्या सचिवांबरोबर झालेल्या चर्चेनुसार येवल्यातून ८०, मालेगावमधून ६३, त्रंबकेश्वरमधून १२, दिंडोरीतून १०, निफाडमधून ४१, इगतपुरीतून १४, देवळातून ११ तर, नाशिक तालुक्यातून ९ असे एकूण २४० संस्थांनी थकबाकीदार सभासदांकडील थकबाकीची रक्कम वसुल करून व उर्वरित मुद्दला एवढे रक्कमेचे नविन हप्तेबंदीचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचे ठराव व विनंती अर्ज बॅंकेकडे सादर केले.

सदर संस्थेचे प्राप्त ठराव व विनंती अर्जाचा विचार करता, केंद्र व राज्य शासन कर्जमाफी २००८, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपासून वंचित शेतकरी सभासद,

सन २०१९-२०/२०२०-२१ कोरोना सदृश्य परिस्थिती व शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे थकबाकीचा भरणा करू न शकलेले शेतकरी सभासद यांच्यासाठी बँकेने ‘किसान अर्थ सहाय्य योजना’ तयार केली.

या योजनेचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर केला असता त्यास मान्यता मिळाली. सदर योजनेचा बॅंक स्तरावर व्याजदर १०.५० टक्के व संस्थास्तरावर १२.५० टक्के असणार आहे.

थकबाकीदार सभासदांनी त्यांचकडील येणे असलेले मुद्दल व त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम भरणा केलेनंतर क.म. पत्रकातील मंजूर पीक कर्ज रक्कमेपावेतो पीक कर्ज वितरण करण्यात येऊन उर्वरित रक्कम या योजनेंतर्गत वितरण केली जाईल.

जेणे करून सभासदास शासन योजनेतंर्गत तीन लाखपावेतो शून्य टक्के व्याजदराचा लाभ प्राप्त होऊन उर्वरित रक्कमेसाठी योजनेचा व्याजदर लागू राहणार आहे. तरी, जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन भरणा करावा, असे आवाहन बँक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.