Nashik : विमानसेवा सुरू झाल्यास कलाकारांना नवे व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ozar airport

Nashik : विमानसेवा सुरू झाल्यास कलाकारांना नवे व्यासपीठ

नाशिक (जि. नाशिक) : मुंबई, पुणे शहरानंतर सांस्कृतिक (Cultural) व शैक्षणिक (Educational) उपराजधानी म्हणून नाशिककडे पाहिले जाते. शहर विस्तारात पन्नासहून अधिक शैक्षणिक संस्था (Educational Institutes) नाशिकमध्ये आहे, तर पूर्वीपासूनच नाशिकला सांस्कृतिक शहराचा दर्जा आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी हवाई सेवा (Air service) महत्त्वाची आहे. (New platform for artists if airline starts ozar airport Nashik News)

कोरोनाकाळात चित्रपट, मालिकांचे चित्रीकरणाचे प्रमाण नाशिकमध्ये वाढले. त्र्यंबक, इगतपुरीच्या वन क्षेत्रात दररोज शूटिंग सुरू असते, तर नाटक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने कलाकारांचे कायम ये- जा असते. परंतु ही ये-जा रस्ते मार्गाने अधिक असते. विमानसेवा सुरू झाल्यास मुंबई, पुणे बरोबरच टॉलिवूड हैदराबाद, चेन्नई व बेंगलुरु या शहरांमध्येदेखील कलाकारांची ये- जा वाढेल व नाशिकच्या कलाकारांना नवे व्यासपीठ निर्माण होईल.

"कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रात देशभरातील अनेक दिग्गज वयोवृद्ध आहेत. त्यांना वयोमानानुसार मोठे प्रवास झेपावत नाही. नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी ही अडचण प्रकर्षाने जाणवली. तद्वतच नाशिकमधील साहित्यिक, कलाकारांचेदेखील हैदराबाद, दिल्ली किंवा बंगलोरसारख्या शहरांत वरचेवर येणे- जाणे होते. त्यांना जर विमानसेवेचा लाभ मिळाला, तर ते सर्वांसाठी सोयीचे ठरेल. या क्षेत्राच्या विकासाचाही वेग वाढेल. त्यामुळे नाशिकला देशभरातील प्रमुख शहरांशी जोडण्यासाठी विमानसेवेची मोठी गरज आहे. याशिवाय या क्षेत्रांत नव्याने येऊ पाहणाऱ्या पिढीलादेखील शैक्षणीक कामांसाठी, विविध परवानगीसाठी नेहमीच मुंबई, पुण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या दृष्टीनेदेखील विमानसेवा असणे अत्यंत मोलाचे ठरणार आहे."-लोकेश शेवडे, विश्‍वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान

"नाशिक शहराच्या सांस्कृतिक सीमा विस्तारत आहेत. प्रत्येक आठवड्यात होत असलेल्या नाटक, गीत, संगीत कार्यक्रमांबरोबरच जवळजवळ प्रत्येक तिमाहीत देश- विदेश गाजविलेल्या कलाकारांचेही कार्यक्रम होत आहेत. अशा वेळेस आपल्या शहराची एअर कनेक्टिव्हिटी हा कळीचा मुद्दा ठरतो. आत्ताच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळेस फक्त विमान सेवा नसल्यामुळे काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेखक संमेलनात सहभागी होऊ शकले नाहीत. म्हणूनच देशातील महत्त्वाच्या शहरांबरोबरची सातत्यपूर्ण विमान सेवा हा आपल्या शहराचा सांस्कृतिक पोत अजून भरजरी करेल हयात शंकाच नाही."

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

हेही वाचा: नाशिक : मतदार याद्यांमधील घोळ प्रस्थापितांच्या मुळावर

"नाशिक शहरात आजवर दोन वेळेस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले. या व्यतिरिक्त दिवाळी अंकांसारखा रुजलेला उपक्रम, सा. वा. ना., कुसुमाग्रज प्रतिष्ठान, जनस्थान, पवित्र गोदावरी, विविध साहित्य संस्था... अशा अंगाने मायमराठीमध्ये नाशिकची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्या दृष्टीने अनेक साहित्यिक आणि संशोधक यांना अभिव्यक्ती आणि संशोधन यासाठी देश-विदेशात गतिमान भ्रमंती करण्यासाठी नाशिकमधून विमानसेवा आवश्यक वाटते. साहित्यिक-सांस्कृतिक विकास झाला तरच हे जग सुखी, संपन्न होणार आहे. म्हणून याकामी आवर्जून प्रयत्न व्हावेत. उज्ज्वल उद्याची ती एक गुंतवणूक असेल."

- विवेक उगलमुगले, लेखक- कवी

"नाशिकची विमानसेवा तातडीने सुरळीत होणे अत्यावश्यक आहे. कारण साहित्यिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर होत असतात. त्या वेळी रेल्वे व बससेवेपेक्षा विमानसेवेने कमी वेळात ते आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचू शकतील. शिवाय व्यवसाय- नोकरीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांबरोबरच साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकही विमानाने प्रवास करू लागल्यास विमान सेवेला अधिक बळकटी मिळेल. शिवाय बाहेरगावातील साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकतील. त्यायोगे नाशिकच्या सांस्कृतिक विकासाला चालना मिळू शकेल."

- रवींद्र मालुंजकर, कार्यवाह, मसाप नाशिक रोड शाखा.

हेही वाचा: Nashik : ‘कमवा आणि शिका’चा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

"नाशिक शहरात सुरू झालेल्या सिटीलिंकच्या बससेवेचे आता सर्वांना सवय झाली आहे. तद्वतच नाशिकमधून अन्य मोठ्या शहरांत, परराज्यांत तातडीने जाण्यासाठीची सुविधा म्हणून विमानसेवा हवीच आहे. मात्र, त्यात सातत्य न राहिल्यास लोकांना सवय होणार नाही. त्यामुळे नाशिकमधील विमानसेवा सातत्यपूर्ण आणि सुरळीत सुरू झाली पाहिजे. सध्या पुणे-मुंबईला जायचे असले तरी चार-पाच तास लागतात. विमानसेवेमुळे लोकांचा हा वेळ वाचेल. नाशिकहून शिर्डी, मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, विमानसेवेत सातत्य नसल्यामुळे लोक पारंपारिक मार्गानेच प्रवास करतात. त्यामुळे नाशिकहून विमानसेवा सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे."- सुनील ढगे, कार्याध्यक्ष अ. भा. मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा

Web Title: New Platform For Artists If Airline Starts Ozar Airport Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..