esakal | सराफ बाजारात ३०० कोटींची उलाढाल ठप्प; ६० टक्के कामगार गावी परतले

बोलून बातमी शोधा

bullion market

सराफ बाजारात ३०० कोटींची उलाढाल ठप्प; ६० टक्के कामगार गावी परतले

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच व्यवसायिकांची दुकाने महिनाभरापासून बंद आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात रोज १० ते २० कोटींची, तर महिन्याला ३०० कोटींची उलाढाल होते. ती आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. सराफ व्यावसायिकांकडे काम करणारे जवळपास ६० टक्के कामगार गावाकडे परत गेले आहेत.


लॉकडाउनमुळे शहरात कडक निर्बंधाआधी वीकेंड लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यामुळे व्यवसाय पाच दिवसच सुरू होता. त्यामुळे मार्चमध्येही उलाढाल कमी झाली. एप्रिलमध्येही उलाढाल ठप्प असून, मेमध्ये १५ दिवस लॉकडाउन वाढविल्यामुळे सराफ व्यावसायिकांना आता उर्वरित कामगारांनाही सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. ते गावी परतण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात जवळपास सात हजार ८०० व्यावसायिक असून, त्यांच्याकडे पाच हजार कामगार वर्ग आहे. त्यात पॉलिश, घाट, बंगाली कारागिरांचा समावेश आहे. तर दुकानातील कर्मचाऱ्यांसह एकूण २० हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह सराफ बाजारावर चालतो. एप्रिल, मेमध्ये लग्नसराई, पाडवा, अक्षयतृतीया असल्यामुळे रोज ४० ते ५० कोटींची उलाढाल होते, ती पूर्णपणे ठप्प आहे. सराफ असोसिएशनकडून कामगारांना मदत केली जात आहे. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात सर्वाधिक नुकसान सराफ बाजाराचे झाले आहे. सराफ व्यावसायिकांना साधारणतः जानेवारी ते मे हा कालावधी उत्सव आणि लग्नसराईचा असल्याने व्यवसायाची मोठी उलाढाल होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षयतृतीया मेमध्ये असल्याने पाडव्यापाठोपाठ अक्षयतृतीयेलाही उलाढाल ठप्प राहणार असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!


सराफ बाजाराला रोजचा १० ते १५ कोटींचा म्हणजे महिन्याला ३०० कोटींचा फटका बसला आहे. कामगार गावी जाण्याच्या मनःस्थितीत आहे. अनलॉक झाल्यानंतर सराफ व्यावसायिकांना त्यांच्या येण्याची वाट पाहावी लागणार असून, सुरवातीच्या काळात काहीसे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामगारांना जे काही शक्य होईल, ते करण्याचा प्रयत्न सराफ असोसिएशन करत आहे.
चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक

हेही वाचा: VIDEO : नाशिककरांसाठी धरणात पुरेसे पाणी; पाणीसाठा 42 वरून 48 टक्के