Nitin Gadkari : नागपूरप्रमाणे होणार नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल - नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

Nitin Gadkari : नागपूरप्रमाणे होणार नाशिकमध्ये डबलडेकर उड्डाणपूल - नितीन गडकरी

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : नाशिकसाठी २ हजार १०० कोटींचा निओ मेट्रो प्रकल्प मंजूर होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. मेट्रोसाठी ‘इलिव्हेटेड कॉरीडॉर'तंर्गत नाशिक रोड ते द्वारका चौक या मार्गावर नागपूरप्रमाणे डबल डेकर उड्डाणपुलाच्या सोळाशे कोटींच्या मार्गाला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि कोनशिला अनावरण सोहळ्यात इगतपुरी येथे आज श्री. गडकरी बोलत होते.

हेही वाचा: Nitin Gadkari : नाशिक ते मुंबई सहापदरी महामार्गाचे काँक्रिटीकरण : नितीन गडकरी

ते म्हणाले, की मेट्रो प्रकल्पात गंगापूर ते नाशिक रोड हा वीस, तर गंगापूर ते मुंबई नाका हा दहा किलोमीटर असे दोन मार्ग असतील. त्यातील गंगापूर ते नाशिक रोड या मार्गावरील नाशिक रोड ते द्वारका चौक या सहा किलोमीटर अंतरावर डबल डेकर मार्ग असेल. जमिनीवर दोन, त्यावर दोन व उड्डाणपुलावर चार पदरी मार्ग असेल. त्यावरुन मेट्रो धावणार आहे. याशिवाय इंदिरानगरच्या संलग्न सर्व्हिसरोडचा ‘अंडरपास' आणि राणेनगर बोगद्याच्या संलग्न सर्व्हीस रोडचा ‘अंडरपास' वाढवण्याचे काम केले जाईल.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उल्लेख केलेला ड्रायपोर्ट हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्ट' आहे. द्राक्षे, कांदा, भाजीपाला, चारचाकी आणि ऑटोमोबाईल क्षेत्राचे आयात-निर्यात केंद्र त्यामाध्यमातून व्हावे असा माझा प्रयत्न आहे, असे सांगून श्री. गडकरी यांनी सटाणा शहरातील काँक्रिटीकरणाचे काम झाले असून वार्षिक आराखड्यातंर्गत सटाणाच्या ‘रिंग रोड'च्या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल, असे जाहीर केले. ते म्हणाले, की सी. आर. एफ. मध्ये कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र निधी कमी आहे. त्यामुळे संधी मिळेल तशी रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील.

हेही वाचा: Nitin Gadkari : 2024 पर्यंत भारत 'या' गोष्टीत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल; नितीन गडकरींचा मोठा दावा

महामार्ग बांधकामात अडचण

नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी यापूर्वी आलो असताना मुंबई ते नाशिक महामार्गाच्या कामाची मागणी करण्यात आली होती. राज्याचा बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक महामार्गाचे काम करण्याची इच्छा होती. मात्र ‘अलायमेंट' वादामुळे मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाचा प्रश्‍न सुटला नव्हता. आता मात्र महामार्गांची कामे होत असल्याने शेतमालांच्या निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे. महामार्गांच्या लगत शेतमाल निर्यातीसाठी आवश्‍यक असलेली शीतसाखळी उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.