2024 पर्यंत भारत 'या' गोष्टीत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल; नितीन गडकरींचा मोठा दावा I Nitin Gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

'आम्ही देशात जागतिक दर्जाचे रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत.'

Nitin Gadkari : 2024 पर्यंत भारत 'या' गोष्टीत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल; नितीन गडकरींचा मोठा दावा

नवी दिल्ली : आम्ही देशात जागतिक दर्जाचे रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. मी तुम्हाला वचन देतो की, 2024 साल संपण्यापूर्वी आमचे रस्ते, पायाभूत सुविधा अमेरिकेच्या (America) दर्जाप्रमाणं असतील, असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं.

FICCI च्या 95 व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. गडकरी म्हणाले, '2024 च्या अखेरीपूर्वी भारतातील रस्ते, पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीनं असणार आहेत.' जगातील 40 टक्के संसाधनं वापरणाऱ्या बांधकाम उद्योगाबाबत बोलताना गडकरी म्हणाले, इतर पर्यायांचा अवलंब करून बांधकामातील स्टीलचा वापर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बांधकाम उद्योग केवळ पर्यावरण प्रदूषणातच मोठा हातभार लावत नाही, तर जगातील 40 टक्क्यांहून अधिक वस्तू आणि संसाधनं वापरतं.

संसाधनांचा खर्च कमी करण्यावर आणि बांधकामाचा दर्जा सुधारण्यावर आमचा भर आहे. बांधकामासाठी सिमेंट आणि स्टील हे मुख्य साहित्य आहे, त्यामुळं आम्ही पर्यायांचा अवलंब करून बांधकामातील स्टीलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ऊर्जा निर्यातदार म्हणून भारत स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या चांगल्या स्थितीत आहे. नजीकच्या काळात ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा मोठा स्रोत असेल, असंही त्यांनी सांगितलं. हरित हायड्रोजन हा भविष्यात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते वाहतूक, रासायनिक आणि खत उद्योगांमध्ये ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असेल, असंही गडकरींनी स्पष्ट केलं.