Latest Marathi News | रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

Nashik : रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ

नाशिक रोड : कोरोनाकाळात असंख्य रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या १०८ क्रमांकाच्या सरकारच्या मोफत रुग्णवाहिकेची, तिच्यावर नियुक्त डॉक्टर व चालकांची महापालिका वर्षभरापासून हेळसांड करत आहे. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात अनेक रूम धूळखात पडलेल्या असतानाही या रुग्णवाहिकेच्या डॉक्टर्स व चालकांना विश्रांतीसाठी एक रूम देण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे. गाडीतील महिला डॉक्टरांची मोठी कुचंबणा होत आहे. (NMC Avoiding giving room for rest to Ambulance driver doctor Nashik Latest Marathi News)

नाशिकमध्ये आडगाव, नामको रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मोरवाडीतील मनपा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी या रुग्णवाहिका सेवा देतात. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर, ईसीजी मशिन, प्रसूती आदी सुविधा आहेत. एका रुग्णवाहिकेवर प्रत्येकी तीन डॉक्टर्स व चालक असल्याने रात्रंदिवस सेवा देता येते. या रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालकांना थांबण्यासाठी शंभर मीटर परिघात विनामूल्य जागा द्यावी.

रुग्णवाहिकेला चार्जिंग फॅसिलिटी द्यावी, असा अध्यादेश डॉ. नितीन अंबवडेकर (सहसंचालक राज्यस्तर रुग्णालये, आरोग्य सेवा, मुंबई) यांनी १३ ऑक्टोबर २०२१ ला काढला आहे. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्याधिकारी, महापालिकांचे कार्यकारी अधिकारी, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आदींना जीआर पाठविला आहे. बिटको रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील सुसज्ज रुग्णालय समजले जाते.

हेही वाचा: Nashik Political News : आंबेडकरांच्या "फ्लाईंग व्हिजिट" ने राजकीय चर्चेला वेग!

या चार मजली भव्य रुग्णालयात रुग्णवाहिकाला जागा देण्याचे टाळून सरकारलाच आव्हान देण्यात आल्याने या रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन करणाऱ्या बीव्हीजी कंपनीने महापालिका आयुक्तांना काही दिवसांपूर्वी विनंती अर्ज केला आहे. बिटकोमध्ये रुग्णवाहिकेला जागा, चार्जिंग स्टेशन, डॉक्टर व वाहकांना रूम आदी सुविधा द्याव्यात अशी विनंती केली आहे. तरीही महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. जुन्या व नव्या बिटकोत प्रचंड जागा पडून आहे. तरीही टाळाटाळ केली जात आहे.

मनपाच्या रुग्णवाहिका पैसे घेतात. बिटको व मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही ते दाद देत नाही. दुर्घटना घडल्यास त्यांनाच जबाबदार धरून आंदोलन केले जाईल. याबाबात डॉक्टर म्हणाले, की २०१४ पासून बिटकोतील रुग्णांना आम्ही सेवा देत आहोत. पूर्वी आम्हाला रूम होती, नंतर ती काढण्यात आली. कोविडकाळात जिवाची पर्वा न करता सेवा दिली. गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला जागा दिली जात नाही. सुविधा नसल्याने गाडीतील महिला डॉक्टरांचीही कुचंबणा होत आहे.

हेही वाचा: Sadabhau Khot : आजचा शत्रू उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू...: सदाभाऊ खोत

टॅग्स :Nashikambulance