NMC News : महापालिकेचा खत प्रकल्प गुंडाळणार? केमिकल इंजिनिअर पद रद्द केल्याचा परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC News : महापालिकेचा खत प्रकल्प गुंडाळणार? केमिकल इंजिनिअर पद रद्द केल्याचा परिणाम

नाशिक : खत प्रकल्प आउट सोर्सिंगच्या माध्यमातून चालविण्यास दिल्याने महापालिका प्रशासनाने खत प्रकल्पासाठी यापूर्वी भरलेली ८४ विविध पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ज्या पदामुळे खत प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती ते केमिकल इंजिनिअर पद रद्द केल्याने महापालिकेला खत प्रकल्प उभारता येणार नाही.

याचाच अर्थ सध्या अस्तित्वात असलेला खत प्रकल्प भविष्यातदेखील सुरु होणार नाही. त्यामुळे महापालिकेने प्रकल्प गुंडाळल्याचे यानिमित्ताने मानले जात आहे. (NMC fertilizer project will wrapped up Effect of abolition of post of Chemical Engineer nashik news)

महापालिकेच्या खत प्रकल्पाला बारा ऑक्टोंबर २००७ ला मान्यता मिळाली. खत प्रकल्पाला मान्यता देताना विविध संवर्गातील ८४ पदांना शासन निर्णयानुसार मान्यता घेण्यात आली होती. खत प्रकल्पावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत खत प्रकल्प विभागात कायमस्वरूपी नियुक्ती असेल.

नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात बदली करता येणार नाही व पदोन्नतीवरदेखील दावा करता येणार नसल्याचे नियुक्ती पत्रात स्पष्ट आदेशित आहे.

खत प्रकल्पावर ८४ मंजूर पदे मंजूर करताना इलेक्ट्रीशियन ३, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट, टायर फिटर व लिपिक प्रत्येकी एक, पोकलेन ऑपरेटर सात, डंपर, जेसीबी चालक तेरा, हैड्रोलिक मेकॅनिक दोन, मॅकेनिकल फिटर, प्लंबर चार, सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर तीन व २४ मजुर, असे एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली गेली.

२९ पदे रिक्त होती. दहा ते बारा वर्षे खत प्रकल्प महापालिकेने चालविला. परंतु, खत प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असल्याने महापालिकेने २८ डिसेंबर २०१६ पासून खासगीकरण करण्यात आले. खासगीकरण करत तीस वर्षांच्या मुदतीसाठी खत प्रकल्प चालविण्यास दिला गेला.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

त्यामुळे सेवा व प्रवेश नियमावलींना मंजुरी देताना महापालिका प्रशासनाने ८४ पदे व्यपगत करण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द होणाऱ्या पदामध्ये कनिष्ठ अभियंता, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, ऑटो इलेक्ट्रीशियन, स्टोअर कीपर लिपिक, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पोकलेन ऑपरेटर बॉबकॅट चालक, डंपर, जेसीबी चालक (ऑपरेटर), जीप, टँकर, ट्रक, टॅक्टर ऑपरेटर, हैड्रोलिक मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेकॅनिकल फिटर, प्लंबर, टायर फिटर, सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर, मजूर (मशिन शॉप) लोडर या पदांचा समावेश आहे.

या पदामुळेच खत प्रकल्पाला मान्यता

राज्य शासनाने खत प्रकल्पाला मान्यता दिली. त्या वेळी विशिष्ट शैक्षणिक पदाची अर्हतेची अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार केमिकल इंजिनिअर पद निर्मिती करून ते पद भरले गेले.

परंतु खत प्रकल्पाचे खासगीकरण करण्यात आल्यानंतर संबंधित कंपनीकडे अशा पदाची निर्मिती कायम ठेवण्याबरोबरच ते पद भरले गेले की नाही, यासंदर्भात पाहणीदेखील करण्यात आली नाही.

आता ८४ पदे रद्द करताना केमिकल इंजिनिअर पद नसल्याने खत प्रकल्पच गुंडाळण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे खत प्रकल्प राज्यात आदर्श ठरला. त्यामुळे अन्य शहरांनीदेखील नाशिकप्रमाणे खत प्रकल्पाची उभारणी केली असताना महापालिका प्रशासनाकडून प्रकल्प गुंडाळला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.