NMC Flower Festival : महापालिका मुख्यालयात दरवळला पुष्पांचा सुगंध; अद्भुत दुनियेत रमले नाशिककर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Flower Festival

NMC Flower Festival : महापालिका मुख्यालयात दरवळला पुष्पांचा सुगंध; अद्भुत दुनियेत रमले नाशिककर!

नाशिक : एकेकाळी गुलशनाबाद असे नामकरण असलेल्या नाशिकमध्ये नावाला शोभेल असा नावलौकिक पुन्हा मिळविला. महापालिका (NMC) मुख्यालयात विविध रंगी फुलांच्या प्रदर्शनाने नाशिककर भारावले.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांनी अलोट अशा स्वरूपाचा प्रतिसाद दिला. (nmc flower festival second day of exhibition Nashikkar have great response nashik news)

नाशिक महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोज सोसायटी तसेच नाशिक सिटीजन फोरम यांच्यातर्फे पुष्पोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा शनिवारी (ता.२५) दुसरा दिवस होता. दोन दिवसात एक लाखाहून अधिक नाशिककरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनात मिनिएचर लॅन्डस्केपिंग हे महत्त्वाचे आकर्षण आहे. महापालिका मुख्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध फुलांच्या गटांची मांडणी करण्यात आली आहे. गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, अशा शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्या आहे. जमिनीवरील आणि हँगिंग असे दोन्ही प्रकार आहेत.

आयुक्त कार्यालयासमोरील आयफेल टावर, स्वागत कक्षा जवळील चंदेरी उडता अश्व, लाकडापासून बनविलेली अफलातून सजावट हे महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे. पुष्प उत्सवातील दोन्ही सेल्फी पॉइंटवरही गर्दी आहे. दरम्यान पुष्पोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्वर सुगंध हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. पंडित प्रसाद दुसाने यांच्या स्वर ग्रुपने कार्यक्रम सादर केला. अभिनेता किरण भालेराव या वेळी उपस्थित होते. उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी स्वागत केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

प्रदर्शनाचा आज समारोप

२६ मार्चला संध्याकाळी साडेसहा वाजता पुष्पोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॅॉफीचे वितरण हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होईल. महोत्सव २६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी खुला आहे. इएसडीएस वास्तु ग्रुप, ठक्कर ग्रुप ट्रॉफी प्रायोजक आहे.

केशव मते यांना पारितोषिक

‘सकाळ’चे छायाचित्रकार केशव मते यांना प्रेस फोटोग्राफर गटात पारितोषिक मिळाले. प्रशांत खरोटे, सतीश काळे, अशोक गवळी हेदेखील मानकरी ठरले. हौशी गटात प्रथम विजेता प्रणय चोपडे, द्वितीय सुयश मुळे, तृतीय सुमीत शिंगणे. व्यावसायिक गटामध्ये प्रथम निमेश गुंजाळ, द्वितीय संजय जगताप, तृतीय सौरभ अमृतकर यांनी यश मिळवले. निसर्ग छायाचित्रकार तज्ञ श्रीश क्षीरसागर, मूर्तिकार श्याम लोंढे, योगेश कमोद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

टॅग्स :NashiknmcFlower festival