NMC News : नाशिककर नवीन करांमध्ये अडकणार! सर्व व्यवस्थांमध्ये 5 ते 10 पटीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC News : नाशिककर नवीन करांमध्ये अडकणार! सर्व व्यवस्थांमध्ये 5 ते 10 पटीने वाढ

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केली नसली तरी नळजोडणी ते टँकरने पाणीपुरवठा करण्यापर्यंत सर्व व्यवस्थांमध्ये पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. त्यामुळे एकीकडे पाणीपट्टीपासून नाशिककर वाचले तरी नवीन करांमध्ये मात्र अडकणार आहे.

स्थायी समितीची बैठक आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात कराचे नवीन दर ठरविण्यात आले. (NMC News Nashik people will get stuck in new taxes 5 to 10 times increase in all systems nashik news)

नळजोडणीसाठी फेरुल जोडणी शुल्क ५० रुपये यापूर्वी होती. आता ती २५० रुपये करण्यात आली आहे. एक इंच नळजोडणीसाठी शंभर रुपये मोजावे लागायचे, आता पाचशे रुपये आकारले जाणार आहे.

घरगुती अर्धा इंची नळजोडणीसाठी पूर्वी दोनशे रुपये अनामत रक्कम होती. आता ती रक्कम ५०० रुपये, तर एक इंची घरगुती नळजोडणीसाठी आठशे रुपयांनी ऐवजी दोनशे रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

एक इंची फेर नळजोडणी शुल्कापोटी अडीचशे रुपयांऐवजी पाचशे रुपये मोजावे लागणार आहे. बिगर घरगुती नळजोडणीसाठी फेरुल जोडणी शुल्क दहापट करण्यात आले आहे. अनामत रकमेत पाचपट, फेरजोडणी शुल्कात चारपट वाढ करण्यात आली आहे.

नळजोडणी आकारानुसार अनामत रक्कम बदलणार आहे. व्यावसायिक बांधकामासाठी फेरुल जोडणी शुल्क पंधरापट आकारले जाणार आहे. अर्धा इंची नळजोडणीसाठी पन्नास रुपये दर आकारले जात होते.

आता साडेसातशे रुपये मोजावे लागतील. एक इंच व्यावसायिक नळजोडणीसाठी पंधराशे रुपये मोजावे लागणार आहे. व्यावसायिक बांधकामासाठी अर्धा इंचीकरिता अनामत रक्कम आठशे रुपये होती. त्यात बाराशे रुपयाने वाढ करून दोन हजार रुपये करण्यात आली आहे.

एक इंची नळजोडणीसाठी तीन हजार दोनशे रुपये अनामत रक्कम होती, ती आता दहा हजार रुपये करण्यात आली आहे. प्लंबिंग लायसन शुल्क चारपटीने वाढविण्यात आले आहे. पूर्वी अडीचशे रुपये मोजावे लागत होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आता एक हजार रुपये फी अदा करावी लागणार आहे. परवाना फी पन्नास रुपये होती. आता तीन हजार रुपये अदा करावे लागणार आहे. नूतनीकरणासाठी ५० रुपये फी होती. आता एक हजार रुपये व विलंब फी ५० रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आले आहे. नवीन नळजोडणीच्या अर्जाची किंमतही पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा महागला आहे. १००० लिटर पाण्यासाठी आता ३०० रुपये, तर चार हजार लिटरसाठी सहाशे रुपये अदा करावे लागतील. पाच हजार लिटरसाठी ९०० रुपये, तर आठ हजार लिटर पाण्यासाठी १२०० रुपये व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी आठ हजार लिटर पाण्यासाठी अडीच हजार रुपये अदा करावे लागणार आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये ग्रुप कनेक्शन

झोपडपट्ट्यांमध्ये आता पाणी फुकट मिळणार नाही. झोपडपट्टीधारकांना ग्रुप पद्धतीने नळ जोडणी दिली जाणार आहे. घरगुती नळजोडणी शुल्काच्या ५० टक्के रक्कम झोपडपट्टी धारकांकडून घेतली जाणार आहे.

सोसायटीमध्ये नळजोडणी देताना तळमजल्यावर स्वतंत्र टाकी, सोसायटीचा ना हरकत दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. सोसायटीसाठी नळजोडणी घेताना मोटार लावणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashiknmctax