
नाशिक : गणेशोत्सवात निर्माल्य तसेच पीओपी मूर्ती व त्यावरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होत असल्याने सरसकट सर्वच गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून कृत्रिम तलाव निर्मिती करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (NMC Prohibition of immersing idols in river bed to prevent water pollution Ganeshotsav 2022 Nashik Latest Marathi News)
आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळाची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर गणेश मंडळे भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेनेदेखील तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलप्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपयोजनांची माहिती घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही. त्याचबरोबर मूर्तीवर रासायनिक रंग असल्याने पाण्यात मूर्ती विसर्जन केल्यानंतर रासायनिक रंगाचे तवंग पाण्यावर राहतात.
यामुळे पाण्यातील जलचरांच्या जिवांना धोका निर्माण होतो. त्यामुळे या वर्षी सरसकट गणेशमूर्तींचे नदी पात्रात थेट विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव व पारंपारिक विसर्जन स्थळे विकसित केली जाणार आहे. त्या संदर्भातील यादी महापालिकेच्या संकेतस्थळासह ठिकठिकाणी नागरिकांपर्यंत पोचवली जाणार आहे.
नागरिकांनीदेखील महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तात मूर्ती दान उपक्रम राबविला जाईल. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदतदेखील घेतली जाणार आहे. नदीपात्रात मूर्ति विसर्जन केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
शहरात ५२ ठिकाणी कृत्रिम तलाव
महापालिकेकडून दरवर्षी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. यंदाही ५२ ठिकाणी कृत्रिम तलाव व पारंपारिक विसर्जन स्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विसर्जन स्थळावर पोलिस व महापालिकेचे सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहे.
निर्माल्य संकलनासाठी विभागनिहाय स्वतंत्र घंटागाडी विसर्जन मिरवणूक मार्गावरदेखील घंटागाडी तैनात केली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्ग स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विसर्जनाच्या दिवशी महापालिकेकडून वैद्यकीय सुविधा पूर्ण बरोबरच रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार आहे. मूर्ती संकलन केंद्रावर यंदा सेल्फी पॉइंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.