NMC Recruitment : अग्निशमन, वैद्यकीयच्या रिक्त पदांसाठी TCS चा पर्याय | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Recruitment News

NMC Recruitment : अग्निशमन, वैद्यकीयच्या रिक्त पदांसाठी TCS चा पर्याय

Nashik News : आयबीपीएस या संस्थेशी करार करण्याची वेळ आली असतानाच महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांवर भरतीसाठी टिसीएस या संस्थेलादेखील पत्र दिले जाणार आहे.

त्यामुळे भरती प्रक्रिया लांबणार आहे. आयबीपीएस संस्थेने महापालिकेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात टाकलेल्या अटी व शर्तींवर निर्णय न दिल्याने टिसीएस संस्थेकडे देखील पत्र व्यवहार केला जाणार आहे. (NMC Recruitment Alternative to TCS for Fire Medical Vacancies nashik news)

महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली आहे. पालिकेत सद्यस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारीत आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती.

परंतु, २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाईल मंत्रालयात मंजूरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांच्या भरतीसाठी टिसीएस (टाटा कन्सल्टींग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्टिस्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थांना अधिकार दिले.

पालिका प्रशासनाने दोन्ही संस्थांशी पत्रव्यवहार करून प्रस्ताव मागविले. आयबीपीएस या संस्थेने प्रस्ताव सादर केल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याची प्रशासकीय तयारी करण्यात आली. परंतू पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडली.

२ फेब्रुवारीला आचारसंहिता संपुष्टात आल्याने पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतू आयबीपीएसकडून करारातील अटी व शर्तीसंदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याने टिसीएसकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली.

"रिक्त पदांच्या भरतीसाठी टिसीएसकडून देखील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दोन्ही प्रस्तावांची छाननी करून अंतिम निर्णय घेतला जाईल."

-मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, प्रशासन विभाग