esakal | सत्ताधारी भाजपला दणका! 'बिटको'चे खासगीकरण नव्हे, सुविधा वाढविणार; आयुक्तांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

kailas jadhav.png

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाशिकचा पॅटर्न राबविला. आता पुन्हा नव्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. अभ्यासक्रम सुरू झाल्यास महापालिकेला ७२ डॉक्टर उपलब्ध होऊन आरोग्यसेवा देता येणार आहे. 

सत्ताधारी भाजपला दणका! 'बिटको'चे खासगीकरण नव्हे, सुविधा वाढविणार; आयुक्तांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असताना त्याचे निमित्त करून नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा सुरू असलेल्या प्रयत्नांवर आयुक्त कैलास जाधव यांनी साध्या व सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले. कोविडच्या गंभीर परिस्थितीत बिटको रुग्णालयाचे खासगीकरण कदापि होऊ देणार नाही. याउलट रुग्णालयामधील सुविधा अधिक सक्षम करणार असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी भाजपला दणका दिला. 

आयुक्त जाधव यांचे स्पष्टीकरण

रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा नवीन प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठवला जाणार असल्याचे जाहीर करत आयुक्तांनी वैद्यकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविले. हजारांच्या पटीत शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये देखील सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु नगरसेवकांकडून सातत्याने महापालिकेच्या रुग्णालयांवर टीका केली जात आहे. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी ही परिस्थिती कोरोनापूर्वीही होती. रुग्णालयात फिजिशिअनसह अन्य तांत्रिक पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण निर्माण झाला. त्यानंतर सुमारे ५३५ रिक्त पदे मानधनावर भरल्यानंतर बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयाचे कामकाज रूळावर आले. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत वैद्यकीय विभागावर नगरसेवकांनी आगपाखड केली. त्यातून संकट ही संधी साधत थेट बिटको रुग्णालयाचे खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला. 

सुविधा अधिक सक्षम करणार...

स्थायी समितीने व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय दिला. परंतु यातूनही मतभेद समोर आले. नाशिक रोडच्या नगरसेवकांनी बिटकोच्या खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शविला. महापालिकेच्या डॉक्टरांनीदेखील खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत बिटकोमध्ये चांगली सेवा देऊनही अविश्‍वास दाखविला जात असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा भाग असल्याचे मत मांडण्यात आले होते. आता प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त कैलास जाधव यांनी भूमिका स्पष्ट करत बिटको रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला असून, उलट सुविधा अधिक सक्षम करणार असल्याचे सांगितले. 

राजकीय दबाव झुगारणार 

कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना जुने व नवीन बिटको रुग्णालयाचे खासगीकरण अजिबात होऊ दिले जाणार नाही. अगदी राजकीय दबाव आला तरी खासगीकरण होऊ देणार नाही. उलट वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मुंबईमध्ये महापालिकेच्या रुग्णालयांचे खासगीकरण करण्यात आले असून, त्या सेवेचा अनुभव चांगला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ७२ डॉक्टर 

महापालिका व आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त भागिदारीतून २०१७ मध्ये बिटको रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी सादर केला होता. महासभेनेही मंजुरी दिली होती. परंतु शासनाकडे योग्य पाठपुरावा न झाल्याने प्रस्ताव थंडावला. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाशिकचा पॅटर्न राबविला. आता पुन्हा नव्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले. अभ्यासक्रम सुरू झाल्यास महापालिकेला ७२ डॉक्टर उपलब्ध होऊन आरोग्यसेवा देता येणार आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

loading image
go to top