
रामसेतूने कित्येक वर्षांत प्रथमच घेतला मोकळा श्वास
पंचवटी (नाशिक) : रामकुंडासह पंचवटीच्या अनेक भागात स्मार्टसिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहे. यामुळे मार्गातील अडथळेही काढून टाकल्याने सध्या दुचाकींसह चारचाकी वाहने थेट गांधी ज्योत, रामकुंडापर्यंत पोचत असल्याने भविष्यात या ठिकाणी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दुचाकींसह चारचाकी वाहने गांधी ज्योतीकडून रामकुंडाकडे जाऊ नये म्हणून काही वर्षांपूर्वी यशवंतराव महाराज मंदिराच्या मागील बाजूस पक्के अडथळे उभारण्यात आले होते. त्यामुळे चारचाकीच काय दुचाकी वाहनेही या बाजूला नेणे शक्य नव्हते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या कामासाठी हे अडथळे काढून टाकल्याने आता सर्वच प्रकारची वाहने थेट गांधी ज्योतीपर्यंत जात आहे. विशेष म्हणजे त्यांना अटकाव होत नसल्याने या ठिकाणी भाईगिरी वाढली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने गोदाघाटावरील अतिक्रमणे काढण्यात आलेली आहे. त्यामुळे घाटासह रामसेतूने कित्येक वर्षांत प्रथमच मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दिवसभर या ठिकाणी थांबून असतात. परंतु त्यांची पाठ फिरताच सायंकाळी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने स्थानिकांनी सांगितले.
रामकुंडात मोठ्या प्रमाणावर शेवाळ
मागील महिन्यात गंगापूर धरणातून (Gangapur Dam) गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच कुंडे भरून वाहत होती. त्यानंतर पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्याने रामकुंडात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे. गांधी ज्योतीच्या खालील बाजूस नदीत बांध घालून पाणी अडविल्याने रामकुंडात पाणी आहे. अन्यथा इतर कुंडांप्रमाणेच रामकुंडाचीही अवस्था झाली असती. मात्र, नियमित साफसफाई नसल्याने रामकुंडात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे. त्यामुळे श्राद्धादी विधीसाठी आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा: ‘मध्य गोदावरी’ चे पाणी गेवराई मतदारसंघाला मिळणार
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
महापालिका (nmc) अतिक्रमण विभागाने गंगाघाटावरील अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढली आहे. दुसरीकडे आता मोठी वाहनेही रामकुंडापर्यंत येऊ लागल्याने भविष्यात या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी नोंदविली आहे.
हेही वाचा: गोदावरीतून बेकायदा वाळू उपसा
Web Title: Now Vehicles Go Directly To Gandhi Jyoti Removing Obstacles Due To The Work Of Smart City In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..