esakal | अभोण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली; बाधितांचा वाढता मृत्युदर चिंतेची बाब
sakal

बोलून बातमी शोधा

abhona

अभोण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली; बाधितांचा वाढता मृत्युदर चिंतेची बाब

sakal_logo
By
किरण सूर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : गेल्या दोन महिन्यांपासून अभोणा परिसरातील कोरोनाबाधितांची सतत वाढती संख्या अभोणेकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, एकाबाजूला संख्या घटत असलीतरी कोरोनाबाधितांचा वाढता मृत्युदर ही प्रशासनासोबत नागरिकांसाठीही चिंतेची बाब ठरली आहे.

पंचायत समिती, पोलिस व ग्रामपालिका प्रशासनाच्या सकारात्मक आवाहनाला स्थानिक व्यापारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने काही आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक घटत असल्याने प्रशासनाने व नागरिकांनी काहीअंशी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. तर, लक्षणे जाणवत असून, किंवा काहीसा त्रास होत असूनही कोरोनाबाधित याबाबींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. अचानक त्रास वाढला की मगच रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. परंतु, पुरेसा अवधी न मिळाल्याने योग्य उपचार करणे प्रशासनालाही कठीण होते. त्यात उपचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

‘ब्रेक द चैन’मोहिमेंतर्गत अत्यावश्यकसेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून आपापली दुकाने प्रामाणिकपणे बंद ठेऊन प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य केले. तर, काहीवेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांवर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगाही उगारला. पंचायत समिती व ग्रामपालिका प्रशासनाने कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या भागाचा सर्व्हे करून तो परिसर प्रतिबंधीतक्षेत्र म्हणून निर्बंध आणले.आरोग्यसेविका, जिल्हापरिषद प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे स्वतंत्र पथक तयार करून प्रतिबंधितक्षेत्रातील विनाकारण ये जा यावर नियंत्रण ठेवले. तर, ग्रामीण रुग्णालयाने कायमस्वरूपी कोरोना तपासणी सुरू ठेऊन, कोरोनाबाधितांवर योग्य उपचार केल्याने कोरोना रुग्णांची चेन ‘ब्रेक’ करण्यात यश आले आहे. आरोग्य विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकड्यांचा आलेख सतत खाली येतांना दिसतो. सर्व विभागांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. मात्र, संकट अजूनही आव्हाने निर्माण करणारे आहे.

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

loading image