धुळे मांजा जीवावर उठला

धुळे मांजा जीवावर उठला
Published on: 
मांजामुळे दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत -- धुळ्यातील घटना ः बंदी असतानाही खुलेआम विक्रीमुळे धोका सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ ः प्रतिबंधित नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, देवपूर परिसरात दुचाकीस्वाराच्या गळ्यात मांजा अडकल्याने तो बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. रूपेश प्रकाश जाधव (वय ४४, रा. दत्त कॉलनी, देवपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील स्वीकृत नगरसेवक गणेश जाधव यांचे ते बंधू आहेत. रूपेश जाधव दुचाकीने प्रभातनगरकडून एकवीरादेवी मंदिर मार्गाने वीर सावरकर पुतळ्याकडे जात होते. मोठ्या पुलाखालील बोगदा ओलांडल्यानंतर पतंगाचा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. तो बाजूला करण्याचा प्रयत्न करीत असताना, धारदार मांजामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांचे बंधू गणेश जाधव यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉ. केतन नंदवाळकर यांनी दूरध्वनीद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी देवपूर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेस जबाबदार पतंग उडविणाऱ्याविरोधात देवपूर पोलिसांत फिर्याद दाखल करीत असल्याची माहिती नगरसेवक जाधव यांनी दिली. देवपूर परिसरातील नदी-नाल्यांच्या किनारी, तसेच मोकळ्या जागांमध्ये पतंग उडवले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पतंग उडविण्याचा हंगाम नसतानाही काही भागांत पतंग उडविले जात असून, त्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचा आरोप आहे. विक्री आणि वापरावर बंदी असतानाही हा मांजा उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नायलॉन मांजा अत्यंत धारदार असल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. हवेत सहज न दिसणारा किंवा रस्त्यावर लटकणारा मांजा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघात होऊ शकतात. जाधव यांच्याबाबत घडलेल्या घटनेमुळे हा धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांसह त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नदी-नाल्यांच्या किनारी, मोकळ्या जागांमध्ये आणि वस्तीच्या परिसरात होणाऱ्या पतंगबाजीवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com