Latest Marathi News | जुनाट खेळण्या मुलांसाठी हानिकारक; सिडको बाल उद्यानाची दयनीय अवस्था! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cidco Children Park

Nashik News : जुनाट खेळण्या मुलांसाठी हानिकारक; सिडको बाल उद्यानाची दयनीय अवस्था!

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

सिडको परिसरातील गणेश चौकात असलेले सिडको बाल उद्यानाची अतिशय दयनीय अवस्था असून हे उद्यान बालकांना खेळण्यासाठीच आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे जुने खेळणी येथे बसविल्या असून, काही खेळणी तर मुलांच्या खेळण्यासच हानिकारक असून त्यांना यामुळे इजा होण्याची दाट शक्यता आहे. येथील स्वच्छतागृह केवळ देखाव्यासाठी आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या टाकीस नळ नसून पाणी कुठून प्यावे, असा प्रश्न उभा ठाकून आहे. ‘ठेकेदार तुपाशी जनता मात्र उपाशी’, असे चित्र येथे स्पष्ट दिसून येत आहे. (Old toys harmful to children Sad condition of cidco Children Park Nashik Latest Marathi News)

सिडको बाल उद्यान, गणेश चौक

* लहान मुलांना खेळण्यासाठीच्या अनेक खेळणी तुटलेल्या.
* कारंजा शोभेसाठी, त्यातही पाणी साठले असून, मोठ्या प्रमाणावर कचरा पडला आहे.
* कचराकुंड्या तुटलेल्या अवस्थेत.
* येथे असलेली मिनी रेल्वे बंद होऊन मोठा काळ उलटला
* डेब्रिज अजूनही तसेच पडून आहे.
* पथदीप तुटलेल्या अवस्थेत.
* लॉन्सला गरजेपेक्षा जास्त पाणी सोडले जात असल्याने सर्वदूर चिखल.
* स्वच्छतागृह उरले शोभेसाठी
* जागोजागी कचऱ्याचे ढीग
* पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nandurbar News | ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे : मनीषा खत्री

"लहान मुलांना आधीच खेळायला मैदान नाही. त्यात जी उद्याने आहेत, त्या उद्यानातील खेळण्याची झालेली दुरवस्था बघता लहान मुलांचे मैदानी खेळ खेळणे बंदच करायचे का, असा प्रश्‍न आहे. उद्यानातील खेळण्याची देखभाल रामभरोसे झालेली बघावयास मिळत असते."
- वैशाली धात्रक, गृहिणी

"रात्री उद्यान बंद झाल्यानंतर उद्यानांमध्ये असलेल्या बाकड्यांवर मद्यपी मद्यप्राशन करतात. त्यांना कोणी बोलावयास केले असता, अरेरावी केली जाते, धमक्या देतात, शिवीगाळ करतात. पोलिस प्रशासनाने कार्यवाहीसाठी कठोर पावले उचलावी." - लीलावती येवला, गृहिणी

"उद्यानाची झालेली दुरवस्था बघता लहान मुलांसाठी हे उद्यान उरलेलेच नाही. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तर अनेक वर्षापासून येथील कारंजा बंद असून, त्यातील पाणीदेखील काढले जात नाही. त्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे."

- सोनाली आहेर, गृहिणी

"सिडको परिसरातील हे सर्वात जुने उद्यान असून येथील खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छता कर्मचारी फक्त नावाला येऊनच स्वच्छता करतात. साफसफाई केल्यानंतर जमा केलेला कचरा एका कोपऱ्याला लावून दिला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाची शक्यता निर्माण होते. स्थानिक रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर काही दिवस स्वच्छता होते, नंतर प्रशासन मात्र या बाबीकडे लक्ष देत नाही."- ऋतुजा जगताप, गृहिणी

"गार्डनच्या आसपासच्या परिसरामध्ये नेहमीच प्रेमीयुगुलांचा वावर असतो. तर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकदेखील उद्यानामध्ये येऊन बसलेली असतात. त्यांना अटकाव केला असता, अंगावर धावून येणे असे प्रकार घडतात. यावर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे. उद्यानाचे दुरवस्था नवीन नसून नेहमीच उद्यान नेहमीच दुरवस्थेमध्ये बघावयास मिळते."
- संदीप शेवाळे, रहिवासी

हेही वाचा: Nashik News : आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman

टॅग्स :NashikGardencidco