जुने नाशिक- चौक मंडई परिसरातील वझरे गल्लीत मंगळवारी (ता. २२) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक जुना दुमजली वाडा कोसळला. कोसळण्याआधी घराची भिंत आणि माती हलत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत तेथे खेळणाऱ्या मुलांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. काही क्षणांतच संपूर्ण वाडाच कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाड्याच्या मलब्याखाली सहा वाहने अडकून त्यांचे मोठे नुकसान झाले. घटना टळलेली असली तरी, परिसरातील आणखी एका धोकादायक घरामुळे भविष्यातील अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.