
Positive News : कूप्रथेला पहिले स्वतःच्या घरातूनच मूठमाती
नाशिक : हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी ठराव करीत महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या बांगड्या फोडणे, जोडवी व इतर आभूषणे काढून घेणे, टिकली अथवा कुंकू पुसण्याच्या प्रथेवर बंदी आणली. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) त्याला अनुसरून एक परिपत्रक काढत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने असाच ठरावा करावा असे म्हटले आहे. (old widow women destroyed Superstitions Nashik News)
ही बातमी समजताच इंदिरानगर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Andhashradha nirmulan samiti) कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी त्यांच्या विधवा आईला दाखवले. त्यावर आई श्रीमती सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी सुधारणावाद स्वीकारला व शासन परिपत्रकाचा सन्मान राखत आपल्यात बदल घडून आणण्याचे ठरवीत चांदीचे जोडे घेतले व घातलेही. लाल टिकली लावली. इतकेच नाही तर मंगळसूत्रही घेतले. समाज सुधारणेच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याचा आनंद कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला.
"समाजातील कूप्रथा थांबविण्यासाठी माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो. घरातून त्याची सुरवात करावी म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. या कूप्रथामुळे त्रास होत होता. दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. त्यामुळे आज आनंद होत आहे."
- सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे.