नाशिक-पुणे महामार्गावर चोरट्यांनी लांबवला टेम्पोसह 15 लाखांचा मुद्देमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On Nashik-Pune highway, thieves stole goods worth Rs 15 lakh including tempo

महामार्गावर चोरट्यांचा प्रताप; टेम्पोसह लांबवला 15 लाखांचा मद्देमाल

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर शिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या टेम्पोत झोपलेल्या चालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला दगडाने मारहाण करीत त्याच्या ताब्यातील अडीच लाख रुपये किमतीचा टेम्पो, मोबाईल फोन, एक हजार रुपये रोख व हायवा ट्रक बनवणाऱ्या कंपनीचे तेरा लाख दहा हजारांचे साहित्य असा सुमारे साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांना पोबारा केला. मंगळवारी (ता. १६) पहाटे चार वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारातील बायपास रस्त्यावर दीक्षा हॉटेलजवळ ही घटना घडली.

सुनील अनंतराव बापते (३९, रा. विजयनगर सिडको, नाशिक) हा चालक अम्मा इंजिनिअरिंग कंपनीतून विल्होळी व अंबड येथून साहित्य घेऊन टेम्पोने (एम. एच. १५ ईजी ६०२०) घेऊन चाकणकडे जात होता. मध्यरात्री बापते याने झोप येत असल्याने नांदूरशिंगोटे शिवारात हॉटेल दीक्षाजवळ टेम्पो उभा केला व तो केबिन मध्ये झोपला. पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्यास गाडीच्या दरवाजाचा व काचेचा आवाज आल्याने तो दार उघडून बाहेर आला. यावेळी दबा धरुन बसलेले चौघे चोरटे टेम्पोजवळ आले. त्यांनी बापते याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील एक हजार रुपये रोख, मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यास दगडाने मारहाण करुन गाडीतून खाली लोटून दिले.

हेही वाचा: येवला : गहू, हरबऱ्यांसह कांद्याचे क्षेत्र वाढणार!

या घटनेत चोरट्यांनी अडीच लाख रुपये किंमतीचा टेम्पो गाडी व हायड्रोलिक टिपरचे पाच लाख तीस हजार किमतीचे पाच कीट, सात लाख ८५ हजार किमतीचे एक हायड्रोलिक सिलिंडर असा १५ लाख ७० हजाराचा मुद्देमाल घेऊन गाडीसह पोबारा केला. चालकाने परिसरातील हॉटेल चालकांना याबाबत सांगून वावी पोलीस ठाण्यात कळवले. पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक विजय सोनवणे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या.

हेही वाचा: नाशिक : महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

loading image
go to top