Nashik Crime News : CSR निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : CSR निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला गंडा

नाशिक : सेवाभावी संस्थेला देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका संशयिताने सेवाभावी संस्थाचालकालाच १ लाख ३३ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (One cheated by pretending to get CSR funds Nashik Crime News)

अनिल रवींद्र राजेशिर्के (३७, रा.बोरीवली) असे संशयिताचे नाव आहे. केदा पुंडलिक जगताप (रा. यशोदीप अपार्टमेंट, दूर्गानगर, कामटवाडा रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने जगताप यांची गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये भेट घेत एका खासगी बँकेत कार्यरत असल्याची बतावणी केली.

बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही कंपनीच्या ग्राहकांकडून तुमच्या सेवाभावी संस्थेला सीएसआय निधीतून देणगी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी संशयिताने जगताप यांच्याकडून खर्च म्हणून पैसे मागितले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यानुसार जगताप यांनी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संशयिताला द्वारका येथील आयडीबीआय बँकेतून ३० हजार, १६ मार्च रोजी ७० हजार आणि ४ एप्रिल रोजी आयसीआयसीआय बँक पंचवटी शाखेतून ३० हजार रुपये तर, १६ व ३० एप्रिल रोजी ई-स्वरुपात साडेतीन हजार रुपये संशयिताला पाठवले.

मात्र, वर्ष उलटूनही जगताप यांच्या संस्थेकडे कुठल्याही कंपनीने देणगी दिली नाही. त्यामुळे जगताप यांनी संशयिताशी संपर्क साधला असता त्याने धमकी देत घेतलेले १ लाख ३३ हजार ५०० रूपये देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांत याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संदीप पाटील हे तपास करीत आहेत