
Thane Crime : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या
शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपविभाग प्रमुखाच्या डोक्यात चॉपरचे वार करुन शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. फेरीवाल्यांच्या वादातून एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ठाण्यातील जांभळी नाक्याजवळ शिवसेनेचे उपविभाग प्रमुखाचा खून झाला आहे. रवींद्र परदेशी यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यात चॉपरने हल्ला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
रवींद्र परदेशी (वय ४८ रा. खारकर आळी, ठाणे) यांचा ठाण्यातील मुख्य बाजार पेठेमध्ये कटलरीचा व्यवसाय आहे. अंतर्गत वादातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पोलीस स्थानकामध्ये आणि हॉस्पिटलच्या परिसरात गर्दी केली होती.
काल (मंगळवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रवींद्र परदेशी घरी जात होते. यावेळी दोघांनी त्यांच्या डोक्यावर चॉपरने वार केला. हल्ला झाल्यानंतर परदेशी यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
फेरीवाल्यांच्या वादातुन रवींद्र परदेशी यांच्यावर हत्या झाला असावा असा प्रार्थामिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचा तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत. रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्याची माहिती आहे.