esakal | पत्नीचा आग्रह अन् अंधश्रद्धा ठरली जीवघेणी! परिसरात चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

surgana story

पत्नीचा आग्रह अन् अंधश्रद्धा ठरली जीवघेणी! परिसरात चर्चेला उधाण

sakal_logo
By
रतन चौधरी

सुरगाणा (जि.नाशिक) : जग आज एकविसाव्या शतकात प्रचंड प्रगती करीत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातही देश मागे नाही. भूगर्भीय व अवकाशात घडलेल्या घटनांचे विश्‍लेषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचत आहे. मात्र दुसरीकडे आदिवासी भागात अंधश्रद्धेतून अघोरी प्रकारातून करणी, भानामतीसारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. असाच एक प्रकार सुरगाणा तालुक्यातील माणी उंबरदे येथे घडला. या घटनेने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पत्नीचा आग्रह अन् अंधश्रद्धा ठरली जीवघेणी! परिसरात चर्चेला उधाण

अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. परंतु, आदिवासी भागातील लोक वैज्ञानिक जनजागृतीपासून कोसो दूर असल्याचा प्रत्यय तालुक्यातील माणी उंबरदे येथे आला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने या प्रकाराची माहिती ‘सकाळ’कडे विशद केली. माणीजवळील उंबरदे गावाच्या पूर्वेला वडाचामाळ डोंगरावर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बन्सीराम गंगाजी मिसाळ (वय ५२) या कथित बाबाने देवीची मूर्ती तसेच शंकराची पिंड असलेले शेषराव महाराजांचे मंदिर पाच ते सात वर्षांपूर्वी उभारले. याच मंदिरात बन्सीराम मिसाळ पत्नी जानकीसमवेत वास्तव्यास होते. दोघांचीही मंदिरातील शंकराच्या पिंडीवर अपार श्रद्धा होती. दोन ते अडीच वर्षांपूर्वी एक विषारी नाग त्या पिंडीवर बसलेला आढळून आला. पत्नीने पाहिल्यावर साक्षात भगवान शंकरच आपल्या अलोट भक्तीवर प्रसन्न झाल्याची पक्की धारणा त्यांची झाली. पतीने नागाला मंदिराबाहेर हाकलण्याचा एक-दोनवेळा प्रयत्न केला. पण, देवाचाच अवतार नाग असल्याने पत्नीने पतीस मज्जाव केला. त्यानंतर नागाची मंदिरात पूजा सुरू झाली. हे पाहून पत्नीच्याही अंगात वारा संचारू लागला. त्यामुळे

लोकांच्या अज्ञानाचा फायदा

अनेक लोक अंधश्रद्धेपोटी मंदिरात कथित बाबाकडे आपली कौटुंबिक गाऱ्हाणी मांडायला येऊ लागले. बन्सीरामने येणाऱ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेण्यास सुरवात केली. आठवड्यातून एक दिवस सुपात दाणे पाहून अडचणी दूर करण्याची बतावणी केली जाऊ लागली. मग नागाला भक्तांकडून दुधाचा नैवेद्य दाखवला जाऊ लागला. मंदिरात सुपातून सांडलेले धान्य फस्त करण्यासाठी उंदीरही येऊ लागले. कधी कधीच नागाचे दर्शन भक्तांना होत असे. क्षणार्धात तो गायब होत असे. याचेच भक्तांना नवल वाटत असावे. पिंडीखाली जमिनीवर छिद्र असल्याने नागाला चांगलाच अधिवास सापडला. नेहमीच पिंडीवर दुग्धाभिषेक केला जात असल्याने पिंडीखाली गारवा निर्माण होत असल्याने नागाला आयते बिळच सापडले.

अंधश्रद्धा कथित बाबाच्या थेट जीवावरच

१५ एप्रिलला मात्र ही अंधश्रद्धा कथित बाबाच्या थेट जीवावरच बेतली. पाच ते सात अंधश्रद्धाळू भक्त मंदिरात आले असता आजारी व्यक्तीला झटकायला सुरवात केली. भोंदूबाबाने पिंडीवरून दुग्धाभिषेक सुरू केला असता पिंडीवरून अलगदपणे हात फिरवला. त्याचवेळी खाली छिद्रात असलेल्या विषारी नागाने काहीतरी भक्ष्य आले म्हणून मिसाळ यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला कडाडून दंश केला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास पत्नी व आलेल्या भक्तांसमोर घडल्याने त्यांना तत्काळ डोंगरावरील अर्धा किलोमीटरवरून कसेबसे झोळी बांधून खाली रस्त्यावर आणले. उपचारासाठी तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्याचा सल्ला दिला. तत्काळ रुग्णवाहिकेने हलविले. मात्र अर्ध्या रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले.

पत्नीच्या आग्रहामुळे पतीचा मृत्यू

पत्नीच्या आग्रहामुळे चक्क दोन ते अडीच वर्षे महादेव मंदिरात विषारी नाग पाळला खरा. पण, त्याच नागाने पत्नीसमोर केलेल्या दंशाने पतीला जीव गमवावा लागल्याची घटना तालुक्यातील माणी उंबरदे येथे घडली. या घटनेने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

माजी आमदारांकडून कानउघाडणी

केवळ पत्नीच्या हट्टापायी अंधश्रद्धेतून पतीवरच जीव गमावण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अंत्यविधीवेळी माजी आमदार जे. पी. गावित यांनी अंधश्रद्धेतून झालेल्या प्रकाराबद्दल ग्रामस्थांची चांगलीच कानउघाडणी केली.