Summer Electricity Use: उन्हाळ्यात एक हजार 340 दशलक्ष युनिट जादा वीज खरेदी! विजेच्या मागणीत वाढ | One thousand 340 million units of extra electricity in summer Increase in demand for electricity nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran 1.jpg

Summer Electricity Use: उन्हाळ्यात एक हजार 340 दशलक्ष युनिट जादा वीज खरेदी! विजेच्या मागणीत वाढ

Summer Electricity Use : उन्हाळ्यात राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मेमध्ये लघुकालीन करार व पॉवर एक्स्चेंजमधून एकूण एक हजार ३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करून मागणीनुसार पुरवठा केला. (One thousand 340 million units of extra electricity in summer Increase in demand for electricity nashik news)

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीजपुरवठ्याचे नियोजन करताना महावितरणने अधिकची वीज खरेदी केली.

परिणामी मागणीनुसार वीजपुरवठा करता आला. तसेच, कुठेही भारनियमन होऊ दिले नाही. उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्च व एप्रिलमध्ये विजेची कमाल मागणी अनुक्रमे २४ हजार ९८३ मेगावॉट व २४ हजार ३२६ मेगावॉट इतकी नोंदली गेली आहे. मेमधील कमाल मागणी २४ हजार ४७ मेगावॉट होती.

मार्चमध्ये ३०० मेगावॉट, एप्रिलमध्ये ४०० मेगावॉट आणि मेमध्ये ४०० मेगावॉट विजेच्या खरेदीसाठी लघुकालीन करार करण्यात आले होते. या माध्यमातून तीन महिन्यांत महावितरणने ६५६ दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली.

उन्हाळ्यातील वाढती विजेच मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने पॉवर एक्स्चेंजच्या सुविधेचाही लाभ घेतला आहे. विजेची उपलब्धता आणि दर लक्षात घेऊन नियमितपणे पॉवर एक्स्चेंजवरून विजेची खरेदी केली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महावितरणने पॉवर एक्स्चेंजवरून मार्चमध्ये १३९ दशलक्ष युनिट, तर एप्रिलमध्ये ३२९ दशलक्ष युनिट वीजखरेदी केली. मेमधील वीज खरेदी २१६ दशलक्ष युनिट इतकी होती.

महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे मार्चमध्ये ५०० मेगावॉट, एप्रिलमध्ये ४५० मेगावॉट आणि मेमध्ये २५० मेगावॉट वीज उपलब्ध केली.

पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल, त्या वेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलवीज प्रकल्पातून गरजेनुसार एक हजार ९०० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे.