esakal | कांद्याचे लिलाव सुरू! पिंपळगाव बसवंतला शुक्रवारी सर्वाधिक भाव 
sakal

बोलून बातमी शोधा

01_10_2019-onion_1_19631811.jpg

वरुणराजामुळे कांदा लागवडीपासून उत्पादनापर्यंतचे वेळापत्रक कोलमडले असल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. मात्र तरीही कांद्याच्या भावात घसरण होत नाही म्हटल्यावर इजिप्त आणि तुर्कस्तानमधून कांद्याच्या आयातीवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे.

कांद्याचे लिलाव सुरू! पिंपळगाव बसवंतला शुक्रवारी सर्वाधिक भाव 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : केंद्र सरकारने साठवणूक मर्यादा तीन दिवसांपर्यंत वाढवलेली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यात सोमवार (ता.२६)पासून बंद पडलेले कांद्याचे लिलाव शुक्रवार (ता. ३०)पासून सुरू झाले. पिंपळगाव बसवंतमध्ये क्विंटलला सर्वाधिक सरासरी पाच हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. गेल्या शुक्रवारी (ता. २३) कांद्याला पिंपळगावमध्ये सहा हजार ४५१, तर लासलगावमध्ये पाच हजार ८०० रुपये असा भाव मिळाला होता. लासलगावला शुक्रवारी पाच हजार १०० रुपये या भावाने कांद्याची विक्री झाली. 

पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक पाच हजार ८०० रुपये भाव 
वरुणराजामुळे कांदा लागवडीपासून उत्पादनापर्यंतचे वेळापत्रक कोलमडले असल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. मात्र तरीही कांद्याच्या भावात घसरण होत नाही म्हटल्यावर इजिप्त आणि तुर्कस्तानमधून कांद्याच्या आयातीवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून (ता.२) दुबईहून इजिप्त आणि तुर्कस्तानच्या कांद्याची दिवसाला २५ ते ३० कंटेनर आवक होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत दिवसाला आठ ते नऊ कंटेनर कांद्याची आयात होत आहे. मात्र, आयात कांद्याच्या चवीमुळे ग्राहकांच्या प्रतिसादाचा प्रश्‍न भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी चवीच्या कारणामुळे आयात केलेल्या कांद्याला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा अनुभव जमेस आहे.

आयात कांद्याला चवीमुळे ग्राहकांच्या प्रतिसादाचा प्रश्‍न भेडसावणार 

वाहतूक खर्च कमी करण्यासाठी दुबईहून कांदा आयात केला जात आहे. हा कांदा ग्राहकांना ४० ते ४५ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये आयात कांद्याचा वापर झाला होता. सद्यःस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल खुले करण्यात आले असले, तरीही ग्राहकांची वर्दळ वाढलेली नाही. त्यामुळे आयातदारांना घरगुती ग्राहकांशिवाय पर्याय उरणार नसल्याचे दिसते. एका कंटेनरमध्ये सर्वसाधारणपणे तीनशे टन कांदा बसतो. हा कांदा पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली या महानगरांमधील ग्राहकांसाठी विकण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न राहील. 

पिंपळगाव बाजार समिती गजबजली 
पिंपळगाव बसवंत ः कांद्याचे लिलाव बंद असल्याने ओस पडलेले बाजार समिती आवार लिलावाने आज पुन्हा गजबजले. सहा हजार एक... दोन... तीन अशा बोलींचा आवाज घुमला. लिलाव बंद होण्याच्या पूर्वीच्या दरात अल्प सुधारणा झाली. जिल्ह्यातून इथे साडेतीन हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यास क्विंटलला किमान अडीच हजार, तर कमाल सात हजार १४० रुपये असा भाव मिळाला. सरासरी भावाचा विचार करता, दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. लाल कांद्याची आवक कमी होती. कांदा लिलावात जीवन बाफना, नेमिचंद धाडिवाल, संजय ठक्कर, केतन पूरकर, संतोष झनकर, सुरेश पारख, दिनेश बागरेचा आदी सहभागी झाले. बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी लिलावाची पाहणी केली. 

लासलगावमध्ये सहा हजार रुपये भाव 
लासलगाव ः येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ३०६ वाहनांतून तीन हजार २९२ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सहा हजार चार रुपये क्विंटल असा अधिकचा, तर एक हजार ११ रुपये किमान भाव मिळाला. कांद्याच्या भावात वाढ होत आठ हजारांचा टप्पा ओलांडला होता. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना २५ टनापर्यंत निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते. लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे सहा हजार ३५१ रुपये इतका अधिकचा भाव मिळाला. 

कांद्याला मिळालेला भाव 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजार समिती शुक्रवार (ता. ३०) शुक्रवार (ता. २३) 
येवला ५ हजार ३०० ५ हजार ४०० 
नाशिक ४ हजार ५५० ५ हजार ८०० 
कळवण ५ हजार ५०० ६ हजार ५०० 
मनमाड ४ हजार ९०० ५ हजार ५०० 
(शुक्रवारी (ता. २३) मुंगसेमध्ये पाच हजार ७५, चांदवडमध्ये पाच हजार ५००, सटाण्यात सहा हजार २५०, नांदगावमध्ये चार हजार ८००, देवळ्यात पाच हजार ८०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला होता.) 

अतिपावसामुळे चाळीत साठवलेल्या उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आज मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्‍न भेडसावतो आहे. नवीन पीक हाती येत नाही, तोपर्यंत कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्‍न आमच्यासमोर उभा राहिला आहे. - शरद नागरे (कांदा उत्पादक, पाचोरे, ता. निफाड)