Gulf War Impact on Lasalgaon Market
esakal
लासलगाव, ता. ५ : अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका देशातील कांदा निर्यातीला बसला असून, मार्च २०२६ मध्ये आखाती देशांकडे होणारी कांदा निर्यात तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे दर कोसळले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मार्च २०२६ मध्ये सुमारे ३५० कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात झाली, तर गेल्या वर्षी मार्च २०२५ मध्ये हीच संख्या ६०० कंटेनरपर्यंत पोहोचली होती. जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे ३५ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषीमाल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिली.