कांदा उत्पादकांसमोर चिंतेचे ढग; खराब वातावरणामुळे रोगांच्या प्रादुर्भावाची भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion

नाशिक : खराब वातावरणामुळे कांदा उत्पादकांसमोर चिंतेचे ढग

अंबासन (जि. नाशिक) : वातावरणात बदल होताच कांदा (Onion) पिकाचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांत धडकी भरली आहे. धुके (Fog), ढगाळ हवामान (Cloudy weather), वातावरणातील आर्द्रता (Humidity) यामुळे कांदा पिकावर रोगराई पसरण्याची शक्यता वाढणार असल्याचे कांदा उत्पादकांकडून बोलले जात आहे. बहुतांश कांदा उत्पादक महागडे औषध फवारणी करून लागवड केलेला कांदा वाचविण्याची धडपड करीत आहे.

वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांची उडाली झोप

एकीकडे कांदा उत्पादक वाजवी मोल देऊनही मजूर टंचाईने हवालदिल असतानाच आता वातावरणातील बदलाने मेटाकुटीस आला आहे. बहुतांश शेतीत अजूनही कांदा लागवड सुरूच असून, यावर्षी मजूर टंचाईमुळे फेब्रुवारीपर्यंत कांदा लागवड चालणार असल्याचे बोलले जात आहे. शेती मशागतीपासून तर कांदा लागवड होईपर्यंत अनेक अडचणींवर मात करावी लागत आहे. मजूर टंचाईसह महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वीजेचा लपंडाव, औषध फवारणीचे भरमसाठ वाढलेले भाव, वातावरणातील बदल अशा एक ना अनेक समस्यांवर मात करून शेतकरी शेतात कष्ट करून पिके घेत आहेत. सध्या बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा लागवड झाली असली तरी महावितरण कंपनीकडून थकीत वीजबील असलेले रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपासून अचानक वातावरणातील बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, कांदा पिकावर रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे कांदा उत्पादकांकडून सांगितले जात आहे. कांदा लागवड झालेल्या शेतात खराब वातावरणामुळे रोगराई पसरू नये, यासाठी शेतकरी औषध फवारणी करीत आहेत.

हेही वाचा: कोरोनाची भीती! नाशिकमध्ये फक्त दहावी बारीवी वर्ग सुरु; बाकी शाळा बंद

दर पंधरा दिवसांनी ढगाळ हवामान आणि तुरळक, मध्यम पावसामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान होत आहे. या संकटाशी सामना करत लागवडीला दुप्पट खर्च करून कांदा उत्पादक शेतकरी कसाबसा उभा राहतोय. तोच ढगाळ वातावरण, पावसामुळे कांद्यावर डावणी, मावा, तुडतुडे, पाने पिवळी पडणे अशा प्रकारचे रोग येत आहेत. - प्रवीण आहिरे, कांदा उत्पादक, अंबासन

''सतत वातावरणातील बदलामुळे कांदा पिक येईल की नाही, याची शाश्‍वती नाही. मजूर टंचाईने आधीच कंबरडे मोडले आणि आता कांदा वाचविण्यासाठी बदलत्या वातावरणात दोन हात करावे लागणार आहेत.'' - धर्मराज आहिरे, कांदा उत्पादक, राजपुरपांडे

हेही वाचा: लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये पुन्हा तोतया मेजर गजाआड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top