"हॅलो..मी मिलिटरी कॅम्पातून बोलतोय.." समोरून आवाज येताच व्हा सावध

call recive 1.jpg
call recive 1.jpg

नाशिक : वाल्मिक डावरे यांना गेल्या सोमवारी (ता. 22) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोबाईलवर फोन आला. संशयित सायबर भामट्याने, पुण्यातील मिलिटरी कॅम्पमधून बोलत असल्याचे सांगितले, तसेच मालेगावमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाठवायचे असल्याचे म्हणाला..त्यानंतर असे काही घडले की सर्वांनाच धक्का बसला,

काय घडले नेमके?

पंचवटीतील पेपर कप व्यावसायिक वाल्मिक डावरे यांना गेल्या सोमवारी (ता. 22) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोबाईलवर फोन आला. संशयित सायबर भामट्याने, पुण्यातील मिलिटरी कॅम्पमधून बोलत असल्याचे सांगत, पेपर कप खरेदीसंदर्भात विचारले. तसेच, हे पेपर कप मालेगावमध्ये कोरोना रुग्णांसाठी पाठवायचे असल्याचे म्हणाला. त्यानंतर काही वेळाने त्याने पुन्हा फोन केला आणि श्री. डावरे यांना, तुमच्या मोबाईलवर एक क्‍युआर कोड पाठविला असून तो स्कॅन करताच तुमच्या बॅंक खात्यात खरेदीचे पैसे जमा होतील. ते जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर पेपर कप पाठवा असे म्हणाला. त्यानुसार, श्री. डावरे यांनी मोबाईलवर आलेला क्‍युआर कोड स्कॅन केला असता, भामट्याकडून पैसे येण्याऐवजी अवघ्या काही मिनिटांमध्ये श्री. डावरे यांच्याच एसबीआय बॅंकेच्या खात्यातून तब्बल 91 हजार 275 रुपये परस्पर वर्ग झाले. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या याप्रकारानंतर श्री. डावरे यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे झाले सावधान
याचप्रमाणे, शहरातील एका कांदा व्यापारी आणि एका पाणी बॉटल व्यावसायिकालाही पुण्याच्या मिलिटरी कॅम्पमधून बोलत असल्याचे सांगत, मिलिटरीसाठी एक ट्रक कांद्याची आणि पाण्याच्या बॉटल खरेदीसाठी फोन आले होते. खरेदीसंदर्भातील फोनवरून चर्चा झाल्यानंतर संशयित भामट्याने त्यांना आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याचेही सांगितले. त्यानुसार संशयिताने काही वेळाने दोघा व्यावसायिकांना फोन करून क्‍युआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्याचवेळी दोघेही व्यावसायिक सावध झाले आणि त्यांनी त्यानंतर ना तो कोड स्कॅन केला वा ना त्या भामट्याला संपर्क साधला. मात्र यामुळे ते लाखोच्या फसवणूकीपासून बचावले.

दोन लाखांची रक्कम परत
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन भामट्यांनी फंडे वापरून गंडा घातला तर काही गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांची 2 लाख 77 हजार 400 रुपयांची गेलेल्या रकमेपैकी सायबर पोलिसांनी 2 लाख 15 हजार 400 रुपयांची रक्कमही परत मिळविली आहे. पेटीएम केवायसी अपडेटची बतावणी करून ऑनलाईन भामट्याने 2 लाख 26 हजारांची रक्कम वर्ग केली होती. याप्रकरणी वेळीच गुन्हा दाखल झाल्याने 1 लाख 64 हजारांची रक्कम रोखून ती तक्रारदार बद्रीनाथ मते यांना परत मिळाली. तर, पार्थ ग्लोबल संकेतस्थळावरून जुनाआयफोन मागविला असता, त्यापोटी आगाऊ 10 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले परंतु फोन तर आला नाहीच उलट 10 हजारांची फसवणूक झाली असता, वेळीच पोलिसात धाव घेतल्याने अखिल साळवे यांना गेलेली दहा हजारांची रक्कम परत मिळाली. तसेच, सचिन कुलकर्णी यांना व्हॉटसऍप वापरताना अडचण येत असल्याने त्यांनी गुगलवरून व्हॉटसऍपच्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधला असता, शुल्कापोटी संशयिताने बॅंकेची माहिती घेत 17 हजार 500 रुपये ऑनलाईन गंडा घातला. ही रक्कमही सायबर पोलिसांनी मिळवून दिली. तर, दीपक पाटील यांना बॅक ऑफ बडोदातून मॅनेजर बोलत असल्याचे भासवून नवीन डेबीट कार्डसाठी 84 हजार 714 रुपयांना गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी 23हजार 900 रुपयांची रक्कम ऑनलाईन रोखून परत मिळविली. यासाठी सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरीक्षक संदीप बोराडे, कृष्णा राठोड, प्रदीप वाघ, मंगेश काकुळदे यांनी कामगिरी बजावली. 

वेळीच सावधगिरी बाळगणे गरजेचे

मिलिटरी कॅम्पातून बोलत असल्याचे भासवून, तुम्ही करीत असलेल्या व्यवसायाशी संबंधित उत्पादन खरेदीचा बहाणा करायचा. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक क्‍युआर कोड पाठविला जातो. तो क्‍युआर कोड स्कॅन केल्यास व्यवहाराचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील असे भासविले जाते. प्रत्यक्षात तो क्‍युआर कोड स्कॅन होताच, संशतियांकडून येणाऱ्या पैशांऐवजी तुमच्या डेबिट वा क्रेडिट कार्डमधून पैसे ऑनलाईन परस्पर वर्ग होतात. सायबर भामट्यांनी नवीन फंडा वापरात आणला असून त्यामुळे आत्तापर्यंत अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. तर काही जागरुकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने ते आर्थिक नुकसानीपासून बचावलेही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com