
SAKAL EXCLUSIVE : आरोग्य विद्यापीठाकडून Onscreen Evaluation
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्रायोगिक पद्धती यशस्वी ठरली आहे. नुकताच झालेल्या परीक्षांमध्ये दंत शाखेतील ‘बीडीएस’ अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ पद्धतीद्वारे तपासल्या.
यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे. अल्प कालावधीत निकाल जाहीर करण्याचा विक्रम विद्यापीठाने प्रस्थापित केला आहे. (Onscreen Evaluation by Arogya University BDS answer sheet check result announced in record time Nashik News)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्हीजन डॉक्युमेंट’ तयार केले होते. विद्यापीठाचे डिजीटलायझेशन करताना कॅम्पस व संलग्न महाविद्यालयांत आमूलाग्र बदल त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडविले जात आहेत.
आरोग्य विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यापीठ परीक्षा उन्हाळी व हिवाळी सत्रामध्ये घेतल्या जात असतात. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या सुधारणा, संशोधनामुळे परीक्षा संचलनामध्येदेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याच्या अनुषंगाने उत्तरपत्रिकांचे ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ पद्धत राबविण्याचे विचाराधीन होते.
त्याअनुषंगाने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बीडीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे प्रायोगिक तत्त्वावर या तंत्राच्या माध्यमातून तपासल्या आहेत.
....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
या कार्यप्रणालीच्या यशस्वितेसाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, सहायक कुलसचिव प्रमोद पाटील, कक्ष अधिकारी विजय जोंधळे, दीपक सांगळे, वरिष्ठ लिपिक चंदा भिसे, लिपिक सुरेश पवार आदींनी परीश्रम घेतले.
अशी राबविली प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. सुमारे चौदा हजार उत्तरपत्रिका ऑनलाइन प्रणालीद्वारे तपासणीसाठी विद्यापीठ संलग्नित २९ दंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध केल्या होत्या. त्यासाठी दंत अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये डिजिटल इव्हॅल्युएशन सेंटर’ ची उभारणी केली. ही ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन ऑफ ॲन्सर बुक’ प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली असून दंत अभ्यासक्रमाचा निकाल प्रात्यक्षिक परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जाहीर केला आहे.
जलदगतीने निकालाचा विक्रम
विद्यापीठाच्या इतिहासातील जलदगतीने निकाल जाहीर होण्याचा हा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला असल्याचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले आहे. ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ प्रणालीचे कार्य यशस्वी झाल्याने उन्हाळी-२०२३ जून-जुलै परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी पद्धत लागू करण्याचा मानस असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.